मुसळधार पावसाने 53 हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान, नगर जिल्हा प्रशासनाचा 22 कोटींच्या भरपाईचा प्रस्ताव

मुसळधार पावसाचा नगर जिल्ह्याला मोठा तडाखा बसला आहे. या पावसाने 53 हजार 115 हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने 22 कोटींच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत नगर, जामखेड, कोपरगाव, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसाने जून महिन्यात 12 लाख 10 हजार रुपयांचे नुकसान झाले. 33 शेतकऱयांची 9.6 हेक्टरवरील शेतजमीन वाहून गेली. जुलै महिन्यात 7 लाख 92 हजारांचे नुकसान झाले. ऑगस्ट महिन्यात 14 हजार 92 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. 10 कोटी 73 लाख 95 हजारांचे नुकसान झाले. तसेच, 557 घरांची पडझड होऊन 265 पशुधनाची हानी झाली. यासह 1 हजार 769 भांडी आणि घरगुती साहित्याची हानी झाली. तसेच, विहीर, दुकाने आणि जनावरे वाहून गेलेल्यांची संख्या 6 हजार 214 असून, यात 2 कोटी 77 लाख 68 हजारांचे नुकसान झाले. 297 हेक्टर शेती वाहून गेली.

26 ते 29 सप्टेंबरदरम्यान गुलाब चक्रीवादळामुळे 25 हजार 589 शेतकऱयांचे 29 हजार 187 हेक्टरवरील शेतीचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीची आकडेवारी प्रलंबित असून, 87 घरांची पडझड, 1 पशुधनाचे नुकसान 39 ठिकाणी विहीर, दुकान अथवा पशुधन वाहून गेलेले आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात 53 हजार 115 हेक्टरवरील शेती बाधित झाली असून, 61 हजार 635 शेतकऱयांचे नुकसान झाले असून, मुसळधार पावसामुळे 1 हजार 36 घरांची पडझड, तर 403 पशुधनाची हानी झालेली आहे. यासह 1 हजार 807 भांडी व घरगुती वस्तूंचे नुकसान झालेले असून, 369 हेक्टरवरील शेती खरडून वाहून गेलेली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने या सर्वांचा पंचनामा करून शासनाकडे 22 कोटींच्या भरपाईचा प्रस्ताव पाठवलेला आहे.