संदेशखळी हिंसाचार प्रकरणात CBI ची कारवाई; पाच बड्या आसामींविरोधात पहिला FIR दाखल

पश्चिम बंगालमधील संदेशखळी हिंसाचार प्रकरण हा राजकीय मुद्दा बनला असून आता या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) कारवाईचा बडगा उगारला आहे. संदेशखळी हिंसाचारप्रकरणी पाच बड्या आसामींविरुद्ध जमीन हडपणे आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोप करत पहिला एफआयआर दाखल केला आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या माहितीनुसार, हे प्रकरण जमीन बळकावण्याचे असून त्यात बड्या आसामींनी पीडित कुटुंबातील महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील पाच आरोपी आणि पीडितांची केंद्रीय अन्वेषण विभागाने ओळख जाहीर केलेली नाही. कोलकाताच्या उच्च् न्यायालयाने 10 एप्रिल रोजी पश्चिम बंगालच्या संदेशखळीमधील महिलांचा लैंगिक छळ आणि जमीन बळकावण्याच्या आरोप प्रकरणात न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआयला तपासाचे आदेश दिले होते. न्यायाच्या हितासाठी या प्रकरणात निष्पक्ष तपास गरजेचा आहे, असे न्यायालयाने आदेशात म्हटले होते.

सीबीआयने या प्रकरणात तक्रार करण्यासाठी ई-मेल आयडीही दिला होता. ज्यामध्ये मोठ्या संख्येने तक्रारी मिळाल्या होत्या. तपास यंत्रणेने आरोपांची शहानिशा करायला आणि त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी संदेशखळी येथे आरोपांची पडताळणी करण्यासाठी एक पथक पाठवले होते. प्राथमिक पडताळणीनंतर सीबीआयने जमीन बळकावणे आणि महिलांवर हल्ले करण्याची प्राथमिक तक्रार दाखल केली आहे.