तिसऱ्या टप्प्यात 26,211 जण बजावणार गृहमतदानाद्वारे हक्क!

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱया टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर सर्वच मतदारसंघांत भर देण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न निवडणूक यंत्रणेकडून केला जात आहे. महाराष्ट्रात तिसऱया टप्प्यात मतदान होत असलेल्या 11 लोकसभा मतदारसंघांतील 26 हजार 211 मतदार गृहमतदानाच्या माध्यमातून आपला हक्क बजावणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेच्या माध्यमातून 26 हजार 211 मतदारांनी नोंदणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक धाराशीव लोकसभा मतदारसंघातील 4588 मतदारांचा समावेश आहे. त्या खालोखात रत्नागिरी-सिंधुदुर्ग 3726, रायगड लोकसभेतील 3146 मतदारांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या 11 मतदारसंघांत 2 कोटी 9 लाख 92 हजार 616 मतदार आहेत. 1 कोटी सात 7 लाख 64 हजार 741 पुरुष, आणि 1 कोटी 2 लाख 26 हजार 946 महिला आणि 929 तृतीयपंथीय मतदार आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील 7, कोकण आणि मराठवाडय़ातील प्रत्येकी 2 अशा एपूण 11 मतदारसंघांत 7 मे रोजी मतदान होत आहे. या मतदारसंघांमध्ये 258 उमेदवार रिंगणात आहेत.

मतदानासाठी 12 डी अर्ज सादर
रायगड – 3146
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 3726
सातारा – 1272
कोल्हापूर – 3103
हातकणंगले – 1122
बारामती – 431
सोलापूर – 2052
माढा – 2346
सांगली – 1859
धाराशीव – 4588
लातूर – 2566