पोलिसांनी वाचवले वृद्ध महिलेचे प्राण

आजारपणाला त्रस्त झालेल्या आणि घरात कोणी नसल्याने आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या वृद्ध महिलेचे बोरिवली पोलिसांनी प्राण वाचवले आहेत.

शहरात वृद्ध असणाऱयाच्या मदतीला मुंबई पोलीस नेहमीच धावून जातात. घरात एकटय़ा असणाऱया वृद्धांना पोलीस वेळोवेळी जी मदत लागेल ती करतात. आज सकाळी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एक फोन आला. बोरिवली पश्चिम येथील एका सोसायटीमध्ये वृद्ध महिला ही घराच्या गॅलरीमध्ये बसून आत्महत्या करत असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. वरिष्ठ निरीक्षक निनाद सावंत याच्या पथकातील पोलीस निरीक्षक नागपुरे, मिल स्पेशलचे संखे हे घटनास्थळी गेले.

पोलीस दुसऱया मजल्यावर गेले. ती महिला घराच्या जाळीवर बसली होती. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत महिलेला घरात ओढले. त्यानंतर महिलेचे पोलिसांनी समुपदेशन केले. गेल्या काही महिन्यांपासून त्या वृद्ध महिला आजारपणाला पंटाळल्या आहेत. त्यातच त्याचा मुलगा आणि सून हे नाशिक येथे कार्यक्रमासाठी गेले होते. त्यांना एकटेपण वाटत होते. त्यामुळे महिलेने आत्महत्येचा विचार मनात आला. महिलेचा मुलगा घरी येईपर्यंत त्यांना शेजारील महिलेच्या घरी ठेवण्यात आले.