गोखले ब्रीज रखडवणाऱ्या कंत्राटदाराला होणार दंड, ‘फॅक्ट फाइंडिंग कमिटी’ रखडपट्टीचा शोध घेणार

अंधेरी येथील गोखले ब्रीज रखडल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून वाहनचालकांचे हाल झाले. यातच आता मे महिन्याच्या मध्यावर बसवण्यात येणाऱया दुसऱया गर्डरचा मुहूर्तही आता लांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गोखले ब्रीज रखडवणाऱया कंत्राटदाराला दंड करण्यात येणार असून अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांचा प्रमुख समावेश असलेल्या ‘फॅक्ट फाइंडिंग कमिटी’च्या माध्यमातून पुलाची रखडपट्टी, बर्फीवाला पूल जोडण्यातील समस्यांचा शोध घेऊन जबाबदार असणाऱयांवर कारवाई करण्यात येणार आहे.

गोखले पुलाच्या कामांत तांत्रिक अडचणी आल्याने गोखले पूल आणि बर्फीवाला पूल दोघांत 2.8 मीटरचे अंतर वाढले. त्यामुळे दोन पूल जोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या या कामातील चुकांमुळे पालिकेला मोठय़ा प्रमाणात टीका झाली. दरम्यान, दोन्ही पूल जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम लवकरच पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. यानुसार जुलैपर्यंत दुसऱया गर्डरची बांधणी पूर्ण होणार असून सप्टेंबरमध्ये हा गर्डर बसवण्याची कार्यवाही पूर्ण होईल, अशी अपेक्षा पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.

सध्या अहोरात्र काम

अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा गोखले ब्रीज 1975मध्ये बांधण्यात आला होता. या पुलाचा काही भाग 3 जुलै 2018मध्ये कोसळून दोघांचा मृत्यू झाल्यामुळे या पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे 7 नोव्हेंबर 2022पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या पुलाची एक लेन 26 फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आली. हा पूल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर अंधेरीसह सांताक्रुझ ते जोगेश्वरी आणि पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे हा पूल पूर्ण करण्यासाठी सध्या रात्रंदिवस दोन पाळ्यांमध्ये काम सुरू आहे.