मिंध्यांच्या मेळाव्यावर गणेश नाईकांच्या कुटुंबाचा बहिष्कार, टिपटॉप प्लाझाकडे कोणी फिरकलेच नाही

मिंधे गटाचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मिंधे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे शहरात घेतलेल्या मेळाव्याकडे भाजपचे नवी मुंबईतील नेते गणेश नाईक यांनी पाठ फिरवली. नाईक कुटुंबातील एकही सदस्य आणि त्यांचे समर्थक या मेळाव्याकडे फिरकले नाहीत. त्यामुळे नाईकांचा मिंधे गटाच्या उमेदवारावर बहिष्कार असल्याचे उघड झाले आहे. म्हस्केंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाईक समर्थकांनी नवी मुंबईत जोरदार निषेध करून त्यांचे काम न करण्याचा निर्णय घेतला होता. ही नाराजी अजून कमी न झाल्यामुळे नरेश म्हस्के यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

नरेश म्हस्के यांची उमेदवारी मिंधे गटाने जाहीर केल्यानंतर भाजपमधून नाराजी उफाळून आली आहे. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी या मतदारसंघासाठी माजी खासदार संजीव नाईक यांना प्रचार सुरू करण्यास सांगितले होते. त्यानुसार नाईकांनी प्रचारही सुरू केला होता. हा मतदारसंघ कोणत्याही पक्षाकडे गेला तरी उमेदवार मीच असणार आहे, असे नाईक यांनी छातीठोकपणे सांगितले होते. मात्र त्यानंतरही काही दिवसात म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाली आणि नवी मुंबई भाजपात संतापाचा भडका उडाला. नाईक समर्थकांनी क्रिस्टल हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत म्हस्के यांच्या उमेदवारीला त्यांच्यासमोरच विरोध केला. नवी मुंबईतून सुरू झालेले विरोधाचे हे लोण ठाणे आणि मीरा- भाईंदरमध्ये पोहोचल्यानंतर मिंधे गटाची मोठी पंचायत झाली. म्हस्के यांच्या प्रचारासाठी आज मिंधे गटाने ठाणे शहरातील टिपटॉप प्लाझामध्ये मेळावा घेतला.

या मेळाव्याला ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक हेही उपस्थित राहिले नाहीत. नाईकांचा एकही समर्थक या मेळाव्याकडे फिरकला नाही. दरम्यान, म्हस्के यांच्यावर सर्वच स्तरांतून नाराजी असल्यामुळे त्यांना निवडणुकीत मोठा फटका बसणार असून शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना नेते खासदार राजन विचारे यांचे पारडे जड झाले आहे.

मनोमिलन झाले नाही

नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भरण्यात आला. त्यावेळी गणेश नाईक आणि संजीव नाईक हे उपस्थित होते. मात्र आज झालेल्या मेळाव्याला संपूर्ण नाईक कुटुंबच आले नसल्याने मनोमिलन झाले नसल्याची चर्चा कार्यकर्त्यांतून ऐकू येत होती. म्हस्केंना होणारा विरोध वाढत चालल्यामुळे मिंधे गटाची डोकेदुखी वाढत चालली आहे.