बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेची फसवणूक, लाखोंचे वाहन कर्ज घेणाऱया तिघांना अटक

बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे वाहन कर्ज घेऊन बँकेची फसवणूक करणाऱया तिघा भामटय़ांना मलबार हिल पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. आरोपीकडून एक फॉरच्युनर कार जप्त करण्यात आली आहे.

मलबार हिल परिसरातील एका बँकेकडे बनावट कागदपत्रे सादर करून आरोपींनी 45 लाखांचे वाहन कर्ज घेतले होते. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बँक व्यवस्थापकाने मलबार हिल पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तेव्हा तन्मय सरकार व इम्रान हुसेन मेहरदीन या दोघांनी पश्चिम बंगालमध्ये राहणाऱया तन्मय तापस सरकार यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड व इन्कम टॅक्स रिटर्न कागदपत्रे बेकायदेशीरपणे मिळवली. मग त्या कागदपत्रांमध्ये आवश्यक बदल करून ती बनावट कागदपत्रे वाहन कर्ज घेण्यासाठी बँकेकडे सुपूर्द केली. बँकेने त्या कागदपत्रांच्या आधारे 45 लाखांचे वाहन कर्ज दिले होते. ही माहिती मिळाल्यानंतर या गुह्यातील आरोपी इम्रान हुसैन हा जयपूर ते वांद्रे या एक्सप्रेसमधून प्रवास करीत असल्याचे कळताच पोलिसांनी धावत्या एक्सप्रेसमध्ये शोध घेऊन इम्रानला पकडले. त्यानंतर पोलिसांनी दुसरा आरोपी तन्मय सरकार ऊर्फ अस्फाक अजमेरी (30) या कार डिलरला पकडले. अजमेरी हा मूळचा गुजरातचा असून त्याने तन्मय सरकार या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली व त्या कागदपत्रांच्या आधारे बँकेतून वाहन कर्ज घेतल्याचे कबूल केले. त्यानंतर या गुह्याचा मुख्य आरोपी साईनाथ गंजी ऊर्फ विकास याला पकडले. साईनाथ हा काwशल भियाणी या नावाचा वापर करीत होता. साईनाथने अजमेरी याला वाहन कर्ज घेण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवून दिल्याचे कबूल केले. मूळचा तेलंगणाचा असलेल्या साईनाथ याच्यावर पार्कसाईट, वि.प. मार्ग आणि गुन्हे शाखेत गुन्हा दाखल आहे.