एम्सचे 5 डॉक्टर करणार अरविंद केजरीवाल यांचं हेल्थ चेकअप; तिहार तुरुंगात बनवला मेडिकल बोर्ड

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची रक्तातील साखर कमी झाल्याबाबत अनेकदा न्यायालयात चर्चा झाली होती. यावर आता न्यायालयाच्या आदेशानंतर तिहारच्या तुरुंगात केजरीवाल यांच्यासाठी मेडिकल बोर्ड बनविण्यात आला आहे. या मेडिकल बोर्डमध्ये एम्सचे पाच डॉक्टर असणार आहेत. या डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत.

एम्सच्या पाच डॉक्टरांचे पथक तिहार तुरुंगात अरविंद केजरीवाल यांच्या आरोग्याची काळजी घेणार आहे. डॉक्टर निखिल टंडन हे मेडिकल बोर्डाचे प्रमुख असतील. ते आधीपासून मुख्यमंत्री केजरीवाल यांची आरोग्य तपासणी करत आहेत. न्यायालयाने 23 एप्रिल रोजी हा निर्णय दिला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार, मेडिकल बोर्डाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात पुढचे पाच दिवस दिवसातून दोनदा इन्सुलिनचा कमी डोस देण्याचा सल्ला दिला आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS)च्या संचालकांकडून नेमलेल्या डॉक्टरांच्या पथकात एक एन्डोक्रायनोलॉजिस्ट आणि एक मधुमेह विशेष तज्ज्ञ आहे. सोमवारी अरविंद केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेची चाचणी केली असता त्यांच्या साखरेची पातळी 217 एवढी होती. तिहारचे डॉक्टर केजरीवाल यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. केजरीवाल यांना घरचे जेवण दिले जात आहे, अशी माहिती तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

संजय सिंह यांनी केले होते आरोप

आपचे नेते संजय सिंह यांनी भाजपवर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नयाब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना पत्र लिहिले होते. तिहार तुरुंग अरविंद केजरीवाल यांच्यासाठी एक टॉर्चर रुम बनवलेली आहे. सुत्रांकडून त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालय चोवीस तास केजरीवाल यांच्यावर पाळत ठेवत आहेत. ते नेमक काय करतात, काय वाचतात, काय लिहितात, कधी झोपतात, कधी उठतात या त्यांच्या सगळ्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे, असा आरोप संजय सिंह यांनी पत्रातून केला होता.