कोल्हापूरच्या मातीतून निवडून गेलेल्या गद्दारांना धडा शिकवा! आमदार सतेज पाटील यांचे आवाहन

ज्या खासदाराला जीवाचं रान करून निवडून आणलं. त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली. शरद पवार यांचा पक्ष फोडला, अशा गद्दारांना त्यांची जागा दाखविण्याची ही वेळ असून, मतदानातून त्यांना धडा शिकवा, असे आवाहन आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केले.

गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत सतेज पाटील बोलत होते. यावेळी शाहू महाराज छत्रपती, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. या जाहीर सभेला नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.

आमदार सतेज पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कर्तृत्व कोल्हापूर जिह्यासह देशभर पोहोचले आहे. या कर्तृत्वाचा ठसा शाहू महाराज छत्रपती यांच्या माध्यमातून आता दिल्लीत पोहोचवणार आहे. त्यांना दिल्लीत पाठविताना हलगीने नव्हे, तर जोरजोरात बँड वाजवून जल्लोष करीत पाठवायचे आहे. त्यामुळे त्यांना एवढं मताधिक्य दिलं पाहिजे की कोल्हापूरच्या मातीतल्या माणसाची अस्मिता व स्वाभिमान काय असतो, हे दाखवून द्यायचे आहे. हे करत असतानाच या मातीतून निवडून गेलेल्या गद्दारांनादेखील धडा शिकवायचा आहे.

ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, शरद पवार यांचा पक्ष फोडला, त्यांना त्यांची जागा मताद्वारे दाखवून द्या. लोकशाहीत मताची ताकद मोठी आहे. तुम्ही बटन दाबलं तर देशाचे परिवर्तन होणार आहे. महागाई, बेरोजगारी कमी होणार आहे, अशा पद्धतीचे सरकार दिल्लीत आणण्याची भूमिका आपल्याला बजावायची आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना मोठय़ा मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन सतेज पाटील यांनी केले. यावेळी उमेदवार शाहू महाराज छत्रपती, विनायक उर्फ आप्पी पाटील, संजय करडे, दिलीप माने, अकलाकभाई मुजावर, रामराजे कुपेकर, गिरीजादेवी शिंदे, नितीन पाटील, अभिषेक शिंत्रे, गोपाळराव पाटील, प्रा. सुनील शिंत्रे, प्रा. किसनराव कुराडे, स्वाती कोरी, नंदाताई बाभुळकर यांची भाषणे झाली.

प्रभाकर खांडेकर, संभाजीराव देसाई, विक्रमसिंह चव्हाण पाटील, महेश उर्फ बंटी कोरी, विद्याधर गुरबे, विजयराव पाटील, सरपंच प्रशांत शिंदे उपस्थित होते.