व्वा दादा व्वा! गुंडच अजितदादांचा खुलेआम प्रचार करतायेत; रोहित पवार यांचा हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीचा तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला असला तरी बारामती मतदारसंघातकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात अजित पवार गटाकडून धमक्या देण्याचे प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येत होते. त्यावर अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी प्रतिक्रियाही दिल्या होत्या. आता रोहित पवार यांनी एक्सवर फोटोसह एक पोस्ट करत गुंडच खुलेआम आजितदादांचा प्रचार करत असल्याचे म्हटले आहे.

रोहित पवार यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे ‘विचार’ घेऊन राजकारण करतो, असं सांगणाऱ्या अजितदादांना निवडणुकीत मात्र खून, खंडणी, धमकी, अपहरण, मोक्का यांसारख्या गुन्ह्यातील गुन्हेगारांची आणि टोळी प्रमुखांची मदत घ्यावी लागतेय…व्वा दादा व्वा! सामान्य लोकं प्रचार करण्याऐवजी गुंडच अजितदादांचा खुलेआम प्रचार करतायेत आणि या प्रवृत्तीला वेळीच रोखण्यासाठी उद्याचा मतदानाचा दिवस सर्वांत महत्त्वाचा आहे!, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

मुंबईत मराठी लोकांना नोकरी नाकारणं दुर्दैवी
मुंबईतील गुजराती माणसाचा अतिआत्मविश्वास सध्या वाढला आहे. त्यांना माहिती आहे की, येथील राजकारणी आपल्या पाठिशी आहेत. याच अतिआत्मविश्वासातून दक्षिण मुंबईत मराठी माणसांना नोकरी नाकारण्यात आल्याचा प्रकार घडला. ही घटना दुर्दैवी आहे, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. सध्या गुजराती नेत्यांचा आत्मविश्वास आणि अहंकार वाढला आहे. वरुन एक आदेश आला की, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जातात. त्यामधूनच गुजराती कंपन्यांकडून मराठी माणसांना नोकरी नाकारण्याचे प्रकार घडत आहेत. हे असे होत असेल तर मराठी लोकांची ताकद दाखवून द्यावी लागेल, असे रोहित पवार यांनी म्हटले. मुंबईच्या गिरगाव परिसरातील एका नोकरीसाठी देण्यात आलेल्या जाहिरातीवरुन सध्या सोशल मीडियावर वाद सुरु आहे. गिरगाव परिसरात असणाऱ्या या नोकरीसाठी ‘मराठी उमेदवारांनी अर्ज करु नयेत’, अशी खास सूचना जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आली होती. त्यावरून रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.