उन्हापासून संरक्षणासाठी मतदान केंद्र खोलीवर उसाची पाचट टाकण्याचे आदेश

देशभरात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीचा राज्यात पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱया व तिसऱया टप्प्याची कार्यवाही सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत उन्हाची तीव्रता मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याने मतदानासाठी वापरल्या जाणाऱया व्हीव्हीपॅट यंत्राच्या सुरक्षेसाठी मतदान केंद्र खोलीवर उसाचे पाचट टाकण्याचे आदेश नोडल अधिकारी विधानसभा मतदारसंघ तथा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक व मुख्याध्यापक यांना दिले आहेत.

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, शिर्डी लोकसभा मतदारसंघ, तथा उपविभागीय अधिकारी संगमनेर यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघात 278 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषंगाने सद्यःस्थितीमध्ये उष्णतेची लाट बघता संगमनेर तालुक्यामध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त असल्याने तसेच व्हीव्हीपॅट मशिन तापमानाप्रति अतिसंवेदनशील असल्याने जेथे मतदान केंद्रावर पत्र्याचे छत आहे. अशा ठिकाणी तापमानामुळे यंत्रामध्ये बिघाड होण्याची शक्यता लक्षात घेतली आहे. त्यासाठी मतदान केंद्रावरील पत्र्याच्या छतावर उसाचे पाचट, गवत, ज्वारी, बाजरीचे तडस टाकण्याचे काम 10 मेपूर्वी करावे, असे आदेशात म्हटले आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक मतदान केंद्र असलेल्या सर्व संबंधित शाळा यांनी संयुक्तपणे व समन्वयाने प्राधान्याने तत्काळ पत्र्याचे छत असलेल्या मतदान केंद्राच्या छतावर उसाचे पाचट टाकून कार्यवाहीचा अहवाल तातडीने मागविण्यात आला आहे.