महिलेची झडती पुरूषांसमोर घेऊ नका! हायकोर्टाने पोलिसांना बजावले

महिलेची अंगझडती घेताना पंच साक्षीदार महिलाच हवी. पंच पुरुष असेल तर त्याच्यासमोर महिलेची झडती घेणे योग्य नाही, असे उच्च न्यायालयाने पोलिसांना बजावले आहे. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार महिलेची झडती महिला पोलिसांनीच घ्यायला हवी. याचा अर्थ पुरुष पंचासमोर महिलेची झडती घेण्याची मुभा दिलेली नाही. असे केल्यास या कायद्याचा भंग होतो. आरोपी महिलेची झडती, तिच्याकडून जप्त केलेला मुद्देमाल या दोन्ही गोष्टी बेकायदा ठरतात, असे नमूद करत न्या. एन. आर. जमादार यांच्या एकलपीठाने नियाझ इस्लाम ऊर्फ शोभाला एक लाख रुपयांचा जामीन मंजूर केला. अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी नियाझला गेल्या वर्षी पोलिसांनी अटक केली. जामिनासाठी नियाझने याचिका केली होती. ही याचिका न्यायालयाने मंजूर केली.

काय आहे प्रकरण…

गेल्या वर्षी नियाझ व तिच्या साथीदाराला पोलिसांनी ग्रँटरोड येथून अटक केली. नियाझ व तिच्या साथीदाराकडे एमडी ड्रग्ज सापडले. त्यावेळी महिला पोलिसांनी नियाझची झडती घेतली तेव्हा पुरुष पंच हजर होते. हे चुकीचे आहे. कायद्याला अनुसरून नाही. महिलेची प्रतिष्ठा व आत्मसन्मान जपण्यासाठी झडती महिला पंचासमोर घ्यायला हवी. गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. कारवाईआधी ही गुप्त माहिती वरिष्ठांना कळवली नाही. ही अटक व झडतीच बेकायदा आहे. जामीन मंजूर करावा, अशी मागणी नियाझच्या वतीने करण्यात आली.

पोलिसांचा दावा

नियमानुसार नियाझची झडती महिला पोलिसांनीच घेतली. कोणत्याही कायद्याचा भंग झालेला नाही. नियाझ व तिच्या साथीदारावर कारवाई करण्यासाठी जाताना स्टेशन डायरीमध्ये नोंद करण्यात आली होती. ही अटक व झडती वैध आहे. नियाझला जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद सरकारी वकील गीता मुळेकर यांनी केला.

न्यायालयाचे निरीक्षण

कारवाईआधी गुप्त माहिती वरिष्ठांना कळवणे बंधनकारक आहे. महिलेची झडती महिला पंचासमोर घ्यायला हवी. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करायलाच हवी. नियाझवर कारवाई करताना या नियमांचे पालन झाले नाही, असा ठपका पोलिसांवर ठेवत न्यायालयाने नियाझला जामीन मंजूर केला.