पेंग्विनमुळे बक्कळ कमाई, आता गुजरातलाही भुरळ

मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात शिवसेनेच्या पुढाकाराने 2017 मध्ये पेंग्विन आणल्यानंतर उद्यान व प्राणी संग्रहालयाचे उत्पन्न कोटय़वधीवर गेली आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात या ठीकाणी 3 लाख 47 हजार 046 पर्यटकांनी भेट दिली असून तब्बल 1 कोटी 32 लाख 76 हजार 570 रुपयांची कमाई एकटय़ा जानेवारी महिन्यात झाली आहे. मे महिन्यानंतर ही सर्वाधिक कमाई आहे. तर फेब्रुवारी महिन्यात या ठिकाणी 2 लाख 32 हजार 081 पर्यटकांनी भेट दिली असून 89 लाख 5 हजार 915 रुपयांचा महसूल जमा झाला आहे. पेंग्विन पाहण्यासाठी उडणारी झुंबड आणि वाढलेला महसूल यामुळे मुंबईच्या पेंग्विनची आता गुजरातलाही भुरळ पडली आहे. यासाठी गुजरातसह ओडिशा, गोरखपूर आणि लखनौ प्राणी संग्रहालय-उद्यानांकडून पालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाकडे पेंग्विनची मागणी करण्यात आली आहे. शिवाय या पेंग्विनच्या देखभालीसाठी उद्यानाकडे आवश्यक प्रशिक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे. 2017 मध्ये या ठिकाणी आठ पेंग्विन आणल्यानंतर आता पेंग्विनच्या कुटुंबाची सदस्यसंख्या 15 वर पोहोचली आहे. यातील काही पेंग्विन मागणी केलेल्या संबंधित प्राणी संग्रहालयांना दिले जाणार आहेत. दरम्यान, उद्यानात 2017 मध्ये पेंग्विन आणल्यापासून पर्यटकांची संख्या वाढली असून दररोज 15 ते 20 हजारांपर्यंत मिळणारे उत्पन्न आता एक लाखापासून सहा लाखांपर्यंत गेले आहे. दररोज पाच ते सहा हजार तर शनिवार-रविवार, सुट्टीच्या दिवशी येणाऱया पर्यटकांची संख्या आता 28-30 हजारांवर जाते. पेंग्विन आणल्यानंतर येणाऱया पर्यटकांची संख्या वाढली असून उत्पन्नातही वाढ झाली आहे. उद्यान व प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी लहान मुलांना प्रत्येकी 25 रुपये, मोठय़ांसाठी प्रत्येकी 50 रुपये आणि दोन मुलांसह दोन मोठय़ांसाठी चार जणांच्या कुटुंबाला एकत्रित 100 रुपयांत संपूर्ण उद्यान आणि प्राणी संग्रहालय पाहता येते.

2017 मध्ये या ठिकाणी आठ पेंग्विन आणल्यानंतर आता पेंग्विनच्या कुटुंबाची सदस्यसंख्या 15 वर पोहोचली आहे.