माझ्या मराठीची बोलु कौतुकें! परि अमृतातेहि पैजा जिंके। परदेशातील विद्यार्थ्यांना मराठीची भुरळ

‘माझ्या मराठीची बोलु कौतुकें! परि अमृतातेहि पैजा जिंके!’ या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीप्रमाणे मायमराठी भाषेची भुरळ केवळ महाराष्ट्रीयांवरच नाही, तर परप्रांतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांवरही आहे. मुंबई विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागात सर्व 100 टक्के विद्यार्थी परप्रांतीय असून जर्मन भाषा विभागाने सुरू केलेल्या ‘माय मराठी’ अॅपला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवशी दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो. राज्यात या दिवशी विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाचा मराठी भाषा विभाग आणि जर्मन भाषा विभागाकडून मराठी भाषा संवर्धनासाठी वर्षभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये जर्मन विभागाने जगभरात कुठूनही मराठी भाषा शिकता यावी यासाठी ‘माय मराठी’ हे अॅप सुरू केले आहे. हे अॅप पह्नमध्ये डाऊनलोड करता येते. याचा फायदा जगभरातील मराठीप्रेमींना होत आहे. शिवाय जर्मन विभागाकडून अभ्यासक्रम, ऑनलाइन अभ्यासक्रमदेखील सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम पूर्ण झालेल्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

असे आहे मायमराठी अॅप
 ‘माय मराठी’ प्रकल्पात अमराठी भाषिकांसाठी जर्मन भाषा विभागाकडूनही सहा पातळय़ांवर अभ्यासक्रम विकसित तयार करण्यात आला आहे. यामध्ये संभाषण काwशल्ये, व्याकरण, शब्दसंपदा उपलब्ध आहे. ऑडिओ, व्हिडीओ आहेत.

 शिवाय व्यावसायिक गरजा लक्षात घेऊन चार लघु अभ्यासक्रमही तयार करण्यात आले आहेत. यामध्ये परिचारिकांसाठी मराठी, रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी मराठी, बँक कर्मचाऱयांसाठी मराठी आणि शासकीय मराठीचा समावेश असल्याचे विभा सुराणा यांनी सांगितले.

मराठी प्रमाणपत्र अभ्यासक्रमामुळे मला शब्द, व्याकरण, संभाषण कळले. या कोर्समुळे मला मराठी भाषेची गोडी निर्माण झाली आणि बोलण्यामध्ये आत्मविश्वास आला. मी डेंटिस्ट म्हणून खूप चांगल्या रितीने आता पेशंटसोबत मराठीतून बोलू शकते.
 अनिषा आचार्य, पुणे

मराठीप्रेमींसाठी ऑनलाइन कोर्स उपयोगी ठरत आहे. कोविड काळात याचा मोठा फायदा झाला. विद्यार्थ्यांना आकलन, श्रवण, संभाषण, वाचन आणि लेखन अशा माध्यमातूनही मराठी भाषा शिकवली जात आहे.
 विभा सुराणा, जर्मन भाषा विभागप्रमुख

मराठी भाषा संवर्धन, विकासासाठी मराठी भाषा विभागात सुरू असलेल्या 20 विद्यार्थ्यांच्या बॅचमध्ये 75 टक्के विद्यार्थी परप्रांतीय आहेत. इतर भाषिक विद्यार्थ्यांनाही मराठी भाषा आपली वाटू लागल्याचे चित्र आहे.
 विनोद कुमरे, मराठी भाषा विभागप्रमुख

मी मराठी या सुंदर भाषेचा अभ्यास सुरू ठेवला आहे.मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागातील या उत्तम अभ्यासक्रमाबद्दल धन्यवाद! माझ्या छोटय़ाशा दुनियेची दारं आता मराठीच्या एका नव्या, अद्भुत विश्वासाठी उघडली आहेत.
 टोमोकी इवाता, जपान

मराठी भाषा शिकणे ही एक आनंदाची गोष्ट आहे. माझे पती महाराष्ट्रीयन असल्याने मला भाषा शिकायची होती. मुंबई विद्यापीठाची ऑनलाइन सुविधा मिळाली. यामुळे मला केवळ भाषाच नाही, तर महाराष्ट्राची संस्कृतीची माहिती मिळाली.
 युका सारंग, जपान

मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातून ‘प्रमाणपत्र’ हा कोर्स केल्यामुळे माझे शब्दभांडार वाढले. सोप्या पद्धतीने मराठी बोलता येऊ लागले. दररोजच्या बातम्या ऐकणे, मराठी गाणी ऐकणे यामुळे माझ्या मराठी आकलनात भर पडली.
 अंजू सिंह, डोंबिवली