Video : दूध पाजताना 8 महिन्यांची चिमुकली हातातून सटकली अन् बाल्कनीच्या पत्र्यावर अडकली

चौथ्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये दूध पाजत असताना महिलेच्या हातातून 8 महिन्यांची चिमुकली सुटली आणि दुसऱ्या मजल्यावरील पत्र्यावर जाऊन अडकली. यानंतर सुरू झाला त्या चिमुकलीच्या सुटकेचा थरार. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना चेन्नईतील अवाडी येथील एका अपार्टमेंटमध्ये घडली. रविवारी घडलेल्या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे नाव हरिन मेगी आहे. रविवारी सकाळी हरिनची आई अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर असणाऱ्या फ्लॅटच्या बाल्कनीत तिला दूध पाजत होती. मात्र दूध पाजताना चिमुकली हातातून निसटली आणि खाली पडली. सुदैवाने ही चिमुकली दुसऱ्या मजल्यावरील खिडकीबाहेर असणाऱ्या पत्र्यावर अडकली. त्यानंतर कुटुंबियांसह आजूबाजूच्या रहिवाशांनीही तिला वाचवण्यासाठी धावपळ सुरू केली.

पत्र्यावरून चिमुकली घसरल्यास ती जमिनीवर पडू नये म्हणून रहिवाशांनी अपार्टमेंटखाली चादर पकडली आणि त्याखाली गादी ठेवली. तर काही लोकं दुसऱ्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून तिला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. अखेर खिडकीबाहेरील रेलिंगवर उभे राहून एका व्यक्तीने चिमुकलीचा हात पकडला आणि तिला वाचवले. हा प्रकार अवाडीच्या व्हीजीएन स्टेफोर्डमध्ये घडल्याची माहिती पोलीस आयुक्त शंकर यांनी माध्यमांना दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)