नसीम खान यांची उमेदवारी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न, आमचा विरोध नव्हता! संजय राऊत यांची स्पष्ट भूमिका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी काँग्रेसकडून नसीम खान यांना उमेदवारी देण्याबाबत आपला विरोध नव्हता. कोणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय काँग्रेस पक्षाचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच जो उमेदवार असेल त्याला आम्ही महाविकास आघाडी धर्माचे पालन करत विजयी करणारच, असा निर्धारही त्यांनी केला. यावेळी त्यांनी भाजपवर टीका करत अजित पवार यांना जबरदस्त टोला लगावला.

अजित पवार, हसन मुश्रीफ, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांवर कारवाई करा, असे मोदींना आम्ही सांगत आहोत. भ्रष्टाचाराविरोधात मोदी यांची बोंब नसून पोकळ बांध आहेत. देशातील सर्व भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन मोदी भ्रष्टाचाराची लढाई लढत आहेत. अजित पवार यांची ख्याती सध्या धमकीबहाद्दर अशी आहे. ते त्यांच्या मतदारसंघात धमक्या देत आहेत. त्यांनी धमक्या देण्याचेच काम करावे, वैचारिक विधाने त्यांना शोभत नाहीत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

कांदा निर्याबंदीचा निर्णय म्हणजे धूळफेक आणि फसवणूक आहे. या निर्णयाचा पहिला उद्देश म्हणजे गुजरातच्या कांदा उत्पादकांना फायदा पोहचवणे.गुजरातचे कांदा उत्पादक, ठेकेदार, दलाल यांना त्याचा फायदा आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा काहीही फायदा नाही. ज्या देशांसाठी निर्यातबंदी उठवली आहेत. ते अळगाणिस्तान, बांग्लादेश, बहारीनसारखे लहान देश आहेत. तेथे मागणी अत्यल्प आहे. त्या देशात आपल्यापेक्षा स्वस्त कांदा आहे. त्यामुळे हा निर्णय धूळफेक आणि फसवणूक आहे. यात मोदी, शहा यांनी गुजरातच्या शेतकऱ्यांचा, ठेकेदारांचा फायदा करून दिला आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

नसीम खान हे मुंबईतील काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. आमचे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. ते निवडणूक लढण्यासाठी इच्छिक होते. याबाबत त्यांच्याशी आमची चर्चा होत होती. नसीम खान यांना उमेदवारी देऊ नका, असे आम्ही कधीही सांगितले नाही. हा काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांवर त्यांच्या पक्षाने उमेदवार निवडले आहेत. अजूनही काँग्रेसला वाटते की नसीम खान यांना उमेदवारी द्यावी, तर तो त्यांचा निर्णय आहे. महाविकास आघाडीच्या धर्माचे आम्ही पालन करू आणि जो उमेदवार असेल त्याला निवडून आणू, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

मोदींचे आरोप हे हवेतील आरोप असतात. त्यात काहीही तथ्य नसते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगची छाप दिसते, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच भाजपच्या जाहीरनाम्यावर एमआयएमची छाप आहे. ओवैसी यांनी त्यांना जाहीरनामा लिहून दिला आहे, असा आरोपही करता येईल. मात्र, असे आरोप करण्यात तथ्य नाही. मोदी हे गेल्या 10 वर्षांपासून पंतप्रधानपदावर आहेत. त्यामुळे त्यांनी गांभीर्याने वक्तव्य करावे, असेही संजय राऊत म्हणाले.

भाजपसारखे 45 प्लस असे हवेचील नारे आम्ही करत नाही. महाविकास आघाडी 30 ते 35 जागांवर जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यावरही चुरशीची लढत असलेल्या ठिकाणीही आम्ही जिंकू शकतो. देशात भाजप आणि नरेंद्री मोदींविरोधात प्रंचड रोष आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्यासाठी जे वातावरण होते, तसेच वातावरण आज देशात राहुल गांधी यांच्यासाठी आहे. जनतेला देशात राहुल गांधी यांचे नेतृत्व हवे आहे. त्यांच्या सभांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अयोध्येत राम मंदिराच्या नावाखील जे जमिन घोटाळे झाले आहेत, त्यात सर्व भाजपचे नेते आहेत. सुमारे 2 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. स्वस्तात जमिनी घेत त्या राममंदिर ट्रस्टला दसपट भावाने विकण्यात आल्या. ते कोणाला उघडे करण्याची धमकी देत आहेत, ते स्वतःच नागडे झाले आहेत, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला.