धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध व्यक्त करत मुलुंडवासीयांचे मानवी साखळी आंदोलन

रविवारी 4 लाख धारावीकरांचे मुलुंडमध्ये पुनर्वसन करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी मुंबईतील मुलुंड येथे अनेक रहिवासी रस्त्यावर उतरले होते. मुलुंड पूर्व येथील वीर सावरकर रोड येथे हे आंदोलन करण्यात आले. मुलुंडमधील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 64 एकर जागेवर धारावी पुनर्विकास प्रकल्पातील 4 लाख लोकांना वसवण्यात येणार असल्याने मुलुंडमधील प्रकल्पग्रस्तांचे पीएपी (PAP) स्थलांतर करण्याची योजना आखल्याने मुलुंडमधील रहिवासी या प्रकल्पाला विरोध करत आहेत.

पीएपींचे पुनवर्सन करण्यासाठी गृहनिर्माण विभागाने मुंबई महापालिका आणि नगरविकास विभागाला तशा सूचना केल्या आहेत. मुलुंड पूर्व भागातील केळकर कॉलेजजवळ सुमारे 7,349 फ्लॅट्सचे बांधकाम सुरू केल्याचे वृत्त आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मुलुंडकरांमध्ये संतापाची लाट उसळली असून सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी मुलुंडकरांनी केली आहे.

ठाण्यातील वीर सावरकर रोड, मुलुंड पूर्व येथे धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मुलुंडमधील रहिवाशांनी मानवी साखळी आंदोलन केले. एवढ्या मोठ्या संख्येने होणारे हे पुनर्वसन मुलुंडकरांसाठी किती घातक आहे, याबाबत घराघरात जाऊन जनजागृती करण्यात येत आहे.

2019 मध्ये पालिकेने धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या संदर्भात 13,971 सदनिकांच्या बांधकामाची योजना सादर केली होती. शहरातील अनेक भागांमध्ये पीएपीचे पुनर्वसन करणे हा या प्रकल्पाचा उद्देश होता. योजनेनुसार, मुलुंडमध्ये 7,439 चांदिवलीमध्ये 4,000, प्रभादेवीमध्ये 529 आणि भांडुपमध्ये 1,903 सदनिका बांधण्यात येणार होत्या. पालिकेच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणारी जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती.