देशभरात कोरोनाचे 797 नवे रुग्ण

देशभरात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 797 नवे रुग्ण आढळले असून 798 रुग्ण बरे झाले तर पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. सात महिन्यांनंतर कोरोनारुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. याआधी 19 मे 2023 रोजी कोरोनाचे 865 रुग्ण आढळले होते. देशभरात एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा 4091 वर पोहोचला आहे. हे रुग्ण सध्या विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. यात केरळमधील सर्वाधिक 2522 रुग्णांचा तर कर्नाटकातील 568 आणि महाराष्ट्रातील 369 कोरोनाबाधितांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनाच्या जेएन-1 या नव्या व्हेरियंटने बाधित रुग्णांची संख्या 145 वर पोहोचली असून यातील बहुतेक रुग्ण गृह विलगीकरणामध्ये आहेत, तर रुग्णालयात दाखल होणाऱया रुग्णांचे प्रमाण वाढले नसल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.

नवा व्हेरियंट 41 देशांमध्ये पसरला
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालांतर्गत कोरोनाचा नवीन जेएन-1 व्हेरियंट तब्बल 41 देशांमध्ये पसरला आहे. फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, कॅनडा आणि स्वीडनमध्ये जेएन-1 ची प्रकरणे सर्वाधिक आहेत. सर्व प्रकरणांत सौम्य लक्षणे समोर आली आहेत. दरम्यान, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा आणि आवश्यक अंतर राखण्याचा सल्लाही ‘डब्ल्यूएचओ’ने दिला आहे.