‘इंडिया’ची पदयात्रा रोखली, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये तुफान धुमश्चक्री

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने बलाढय़ ब्रिटिश राजवट उलथवून टाकली. गांधींची ती भीती अजूनही कायम आहे. ब्रिटिश घाबरायचे, आज मिंधे सरकारही घाबरले. ‘इंडिया’ आघाडीने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या जनहितविरोधी धोरणांविरुद्ध मुंबईत ‘मी पण गांधी’ ही पदयात्रा आयोजित केली होती. शांततेच्या मार्गाने चाललेली ही पदयात्रा पोलिसांनी मधेच रोखली. या वेळी पोलीस आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. पोलिसांनी लाठीमारही केला. तसेच कॉंग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी आणि कम्युनिस्ट पार्टीचे नेते व कार्यकर्ते अशा 100हून अधिक लोकांना अटक केली. या दंडेलशाहीविरुद्ध ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

‘इंडिया’ आघाडीच्या या पदयात्रेला आज दुपारी मेट्रो सिनेमा चौकातून सुरुवात झाली. आघाडीतील हजारो कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते. या पदयात्रेसाठी ‘इंडिया’ आघाडीने पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र आज आयत्या वेळी पोलिसांनी मेट्रो सिनेमापासून परवानगी नसल्याचे सांगत जमलेल्या कार्यकर्त्यांची धरपकड करायला सुरुवात केली. आम आदमी पार्टीच्या 100हून जास्त कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही हुसकावून लावले. या वेळी पोलिसांबरोबर कार्यकर्त्यांची बाचाबाचीही झाली.

‘देश में आएगी बदलाव की आँधी, मै भी गांधी… तू भी गांधी’ 

यानंतरही मेट्रो सिनेमा चौकातून आघाडीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते ‘देश में आएगी बदलाव की आँधी, मै भी गांधी… तू भी गांधी’ असा जोरदार नारा देत पुढे निघाले. मात्र ती पदयात्रा फॅशन स्ट्रीटजवळ येताच पोलिसांनी अडवून धरली. पदयात्रेला मेट्रोकडून नाही तर रिगल सिनेमाजवळून परवानगी असल्याचे कारण पोलिसांनी सांगितले. त्यानंतरही कार्यकर्त्यांचा लोंढा फॅशन स्ट्रीटजवळच्या महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या दिशेने चालत राहिला.

पोलिसांनी रोखल्याने रस्त्यातच ठिय्या

पोलिसांनी ही पदयात्रा फॅशन स्ट्रीटवर तीन वेळा अडवली. मात्र कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आवर घालणे पोलिसांना शक्य झाले नाही. बॉम्बे जिमखान्यासमोर पोलिसांनी अडवल्यावर सर्वांनी रस्त्यातच ठिय्या मांडत गांधीजींची भजने सुरू केली. बरोबरच मिंधे सरकारच्या दंडेलशाहीविरुद्धही घोषणा दिल्या. पदयात्रेमध्ये टप्प्याटप्प्यावर आघाडीचे अनेक नेते एकेक करून सहभागी होत गेल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आणि पदयात्रा पुढे चालत राहिली. मंत्रालयाशेजारील गांधी पुतळ्याजवळ पदयात्रेची सांगता झाली. या वेळी कार्यकर्त्यांनी ‘जब जब मोदी डरता है, पुलीस को आगे करता है,’ ‘मोदी सरकारचं करायचं काय, खाली डोपं वर पाय,’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

मुंबई कॉंग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड, काँग्रेस नेते संजय निरुपम, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार रवींद्र वायकर, सचिन अहिर, आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव, आमदार विद्या चव्हाण, काँग्रेस आमदार अशोक जाधव, अस्लम शेख, झिशान सिद्धिकी, सचिन सावंत, चरणसिंग सप्रा आदींसह शेकडो शिवसैनिक,  कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.

इंडिया आघाडीने दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा ते महात्मा गांधी पुतळा अशी पदयात्रा काढण्याची परवानगी मागितली होती. परंतु, हे शांतता क्षेत्र असल्याने तसेच उच्च न्यायालयाचे वेगवेगळे निर्बंध असल्याचे कारण देत या पदयात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर पोलिसांनी रिगल सिनेमा ते गांधी पुतळा या मार्गाने पदयात्रेची परवानगी दिली होती.

गोडसेंचे पुजारी गांधींचा आवाज दाबू शकत नाहीत – वर्षा गायकवाड

या प्रकाराबद्दल मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मिंधे सरकार आणि भाजपवर टीका केली. गांधी जयंतीच्या दिवशीच आमची पदयात्रा रोखण्याचा प्रयत्न झाला. पण नथुराम गोडसेचे पुजारी गांधीजींचा आवाज दाबू शकत नाहीत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार तुम्ही का हिरावून घेत आहात? पूर्वी ब्रिटिशांच्या राज्यात महात्मा गांधींच्या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांची धरपकड व्हायची. आज आम्हाला तोच अनुभव आला.