अमित शहा राजीनामा द्या, दोन्ही सभागृहांत उत्तर द्या! संसदेतील दुसरा दिवसही सुरक्षेवरून गाजला

संसदेवर झालेल्या स्मोकबॉम्ब हल्ल्याचे तीव्र पडसाद आज दुसऱया दिवशीही दोन्ही सभागृहांत उमटले. या घटनेची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा तसेच दोन्ही सभागृहांत उपस्थित राहून निवेदन सादर करावे. स्मोकबॉम्बचा हल्ला करणाऱया दोघांना प्रेक्षक गॅलरीचे पास देणाऱया भाजप खासदार प्रताप सिंह यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करत विरोधकांनी एकच गदारोळ केला. अनेक सदस्य आक्रमक झाले. त्यामुळे दोन्ही सभागृहांतील कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. त्यामुळे दुसऱया दिवशीही कुठल्याही प्रकारचे कामकाज होऊ शकले नाही.

जोपर्यंत गृहमंत्री अमित शहा या संसदेतील सुरक्षेच्या मुद्यावरून दोन्ही सभागृहांत निवेदन सादर करत नाहीत तोपर्यंत कामकाज सुरळीतपणे सुरू राहणे कठीण आहे, असे काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी म्हटले आहे. लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही क्षणांतच विरोधकांनी सुरक्षेच्या मुद्यावरून प्रचंड गदारोळ केला. वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचे कामकाज दोन वाजेपर्यंत आणि पुन्हा सुरू झाल्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले, तर राज्यसभेचे कामकाज एकदा तहकूब झाल्यानंतर पुन्हा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. एकंदरीत विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहून सभापती जगदीप धनखड यांनी सोमवारपर्यंत कामकाज तहकूब केले. दरम्यान, याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत सांगितले.