इस्लामी आक्रमकांपेक्षा ब्रिटीशांच्या राजवटीत हिंदुस्थानींना हीन वाटायचे! दत्तात्रेय होसबळे

ब्रिटीश देशातून गेले मात्र त्यांच्या आपल्या विचारांपासून त्यांचे हस्तक, शिक्षणतज्ज्ञ, विद्यापीठे आणि लोकांची मते बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांनी हिंदुस्थानींची सुटका होऊ दिली नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसहकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी म्हटले आहे. मोगलांविरोधात लढणाऱ्या हिंदुस्थानींना इतकं हीन कधीही वाटलं नव्हतं जितकं त्यांना ब्रिटीशांच्या राजवटीत वाटलं असं होसबळे यांनी म्हटले आहे. माजी खासदार बलबीर पूंज यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

होसबळे यांनी म्हटले की, मोगलांच्या राजवटीत हिंदुस्थानी नागरिकांनी त्यांना आपल्यापेक्षा कधीही श्रेष्ठ मानले नाही. मात्र ब्रिटीशांच्या राजवटीत असे नव्हते. ब्रिटीशांनी अशा काही कहाण्या रचल्या की त्यामुळे सर्वसामान्य लोकांना आपण दुबळे आणि उपेक्षित आहोत असं वाटायला लागलं. लोकांना आपल्या संस्कृतीच्या महानतेवर शंका वाटू लागली. होसबळे यांनी पुढे म्हटले की, एका विशेष विचाराने प्रभावित लोकांनी आपली संस्कृती ही कमजोर असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे आपले मोठे नुकसान झाले. हिंदुस्थानी संस्कृतीतील प्रत्येक गोष्ट अवैज्ञानिक आहे असं सांगितलं जाऊ लागलं. नव्या शिक्षण पद्धतीमध्ये शिकलेल्या वैज्ञानिकांना, शिक्षक, पत्रकारांना, न्यायमूर्तींनाही ही बाब खरी वाटायला लागली. बाहेरून आलेले लोकं आपल्यापेक्षा श्रेष्ठ असून सभ्यतेमध्ये आपले कोणतेही योगदान नाही असे लोकांना वाटू लागले. या मानसिकतेतून आता आपण बाहेर येण्याची गरज आहे.

होसबळे यांनी म्हटले की बलबीर पूंज यांनी लिहिलेले पुस्तक हे जर इंग्रजीत असते तर ते दिल्लीतील खान मार्केटमध्ये विकले गेले असते. तिथे येणाऱ्या लोकांनी हे पुस्तक कोणत्यातरी विचारवंताने लिहिले आहे असे समजून विकत घेतले असते. हिंदुस्थानात असे मानले जाऊ लागले आहे की ज्यांना इंग्रजी बोलता येत नाही ते विचारवंत नाहीत. हा विचार तोडण्यासाठी आणि आपल्याला या जोखडातून मुक्त करण्याची गरज आहे.

मोगलांच्या राजवटीत हिंदुस्थानी नागरिकांनी त्यांना आपल्यापेक्षा कधीही श्रेष्ठ मानले नाही. मात्र ब्रिटीशांच्या राजवटीत असे नव्हते. ब्रिटीशांनी अशा काही कहाण्या रचल्या की त्यामुळे सर्वसामान्य लोकांना आपण दुबळे आणि उपेक्षित आहोत असं वाटायला लागलं. लोकांना आपल्या संस्कृतीच्या महानतेवर शंका वाटू लागली.