INDW vs ENGW – जिंकलंत पोरींनो! इंग्लंडचा 347 धावांनी पराभव करत महिला संघाने इतिहास रचला

नवी मुंबईतील डीवाय पाटील मैदानावर रंगलेल्या एकमेव कसोटी सामन्यात हिंदुस्थानच्या महिला संघाने इंग्लंडचा 347 धावांनी दारूण पराभव करत इतिहास रचला. महिला कसोटी क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. या लढतीत दोन्ही डावात मिळून 9 विकेट घेणारी आणि फलंदाजीत 87 धावा करणारी दिप्ती शर्मा (Deepti Sharma) प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी ठरली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानच्या महिला संघाने पहिल्या डावात 428 धावांचा डोंगर उभारला. हिंदुस्थानच्या चार खेळाडूंनी अर्धशतक केले. सतीश शुभाने सर्वाधिक 69, जेमिमा रॉड्रिक्सने 68, यास्तिका भाटियाने 66 आणि दिप्ती शर्माने 67 धावांचे योगदान दिले. त्यानंतर दिप्ती शर्माच्या 7 धावात 5 विकेटच्या बळावर इंग्लंडचा पहिला डाव 136 धावांमध्ये गुंडाळला आणि 292 धावांची मजबूत आघाडी घेतली.

त्यानंतर हिंदुस्थानने आपला दुसरा डाव 6 बाद 186 धावांवर घोषित केला आणि इंग्लंडपुढे विजयासाठी 478 धावांचे बलाढ्य आव्हान ठेवले. दुसऱ्या डावात शेफाली वर्मा 33, स्मृती मंधाने 26, जेमिमा रॉड्रिक्स 27 आणि दिप्ती शर्माच्या 20 धावा केल्या.

दरम्यान, विजयासाठी डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा दुसरा डावही दीडशे धावांमध्ये आटोपला. पहिल्या डावात पाच विकेट घेणाऱ्या दिप्तीने दुसऱ्या डावातही कमाल केली आणि 4 विकेट्स घेतल्या. तिला पूजा वस्त्रकरने 3, राजेश्वरी गायकवाडने 2 आणि रेणुकी सिंहने 1 विकेट घेत उत्तम साथ दिली.