राफेल विमान खरेदी व्यवहार वादग्रस्त विधान, राहुल गांधीना अंतरिम दिलासा कायम

राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त टिपण्णी केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा कायम ठेवला आहे. गांधींविरोधात दाखल तक्रारीवर सुनावणी 26 फेब्रुवारीपर्यंत न घेण्याचे आदेश न्यायालयाने मंगळवारी महानगर दंडाधिकाऱ्यांना दिले.

साल 2018 मध्ये राजस्थान येथील सभेत राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष करताना राहुल गांधींनी कमांडर इन थीफ, चौकीदार चोर है, अशा शब्दात टीका केली होती. गांधींच्या या वक्तव्यामुळे मोदी यांच्यासह भाजप व अन्य सदस्यांचीही प्रतिम मलिन झाल्याचा आरोप करत भाजपचे सदस्य महेश श्रीमल यांनी दंडाधिकारी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.

गिरगाव दंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधीच्या नावे समन्स जारी करून हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्या निर्णयाला गांधींनी उच्च न्यायालयात आव्हान देऊन तक्रार रद्द करण्याचे मागणी केली आहे. राहुल यांच्या याचिकेवर मंगळवारी न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी राहुल यांना गिरगाव न्यायालयात उपस्थित राहण्यापासून दिलेला दिलासा पुढील आदेशापर्यंत कायम ठेऊन न्यायालयाने सुनावणी तहकूब केली.