IPL 2024 – परागने आळवला विजयी राग; राजस्थान रॉयल्सची दिल्ली कॅपिटल्सवर 12 धावांनी मात

रियान परागने आज आपल्या घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्ससाठी विजयी राग आळवला. त्याच्या झंझावाती खेळानंतर आवेश खानने सामन्याच्या शेवटच्या षटकात केलेल्या अचूक माऱयाने राजस्थान रॉयल्सला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 12 धावांनी विजय मिळवून दिला. याचबरोबर घरच्या मैदानावर यजमान संघ जिंकण्याची मालिका सलग नवव्या सामन्यातही कायम राहिली.

राजस्थानच्या 186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरच्या 49 धावांनी दिल्ली कॅपिटल्सचे सामन्यात  कायम ठेवले  होते, पण वॉर्नर बाद होताच दिल्लीची गाडी रुळावरून घसरली. ऋषभ पंत आणि अभिषेक पोरेल यांची युजवेंद्र चहलने विकेट काढून राजस्थानला टॉपवर आणले. मग ट्रिस्टन स्टब्सने 23 चेंडूंत 44 धावा ठोकताना दिल्लीला विजयासमीप आणले होते. 19 व्या षटकात 15 धावा ठोकल्यामुळे दिल्लीच्या जीवात जीव आला होता. शेवटच्या 6 चेंडूंवर 17 धावांची गरज होती. तेव्हा संजू सॅमसनने आवेश खानच्या हातात चेंडू देण्याचा जुगार खेळला आणि आवेशने आवेशपूर्ण मारा करत स्टब्स आणि अक्षर पटेलला अक्षरशः बांधून ठेवत आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आवेशने शेवटच्या षटकात अप्रतिम चेंडू फेकत केवळ 4 धावाच दिल्या. त्याच हाच मारा सामन्याला कलाटणी देणारा ठरला.

त्याअगोदर फलकावर 3 बाद 36 अशी केविलवाणी असताना रियान परागने 45 चेंडूंत ठोकलेल्या 84 धावांच्या फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्सने 5 बाद 185 अशी जबरदस्त मजल मारत दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना चांगलेच झुंजवले.

हिंदुस्थानी संघासाठी खेळताना शतकांची माळ लावणाऱया यशस्वी जैसवालने आज राजस्थान रॉयल्सचा निराश केले. तो बाद होत नाही तोच कर्णधार संजू सॅमसनही संघासाठी चांगली खेळी करू शकला नाही आणि त्याचा  पावलांवर जोस बटलरचेही पाऊल पडले. एकीकडे धावांचा दुष्काळ त्यात कोसळलेल्या विकेट्समुळे राजस्थानची दयनीय अवस्था झाली होती. जिथे पहिल्या दहा षटकांत संघ शे-सव्वाशे धावांची बरसात करतात, तिथे राजस्थान केवळ जेमतेम 58 धावांपर्यंत पोहोचला होता. म्हणजेच षटकामागे 6 धावांचीही सरासरी गाठता आली नव्हती.

यजमानांचा विजय असो!

आतापर्यंत आयपीएलमध्ये झालेल्या नऊ सामन्यांत यजमान संघांनीच विजय मिळवले आहेत. असे आयपीएलमध्ये प्रथमच घडले आहे. त्यात चेन्नई आपले पहिले दोन्ही सामने घरच्याच मैदानावर खेळले आणि जिंकलेसुद्धा. तसेच आज राजस्थाननेही करून दाखवले. ते लखनऊविरुद्धचा पहिला सामनाही जयपूरलाच जिंकले होते तर आजही त्यांनी दिल्लीवर मात केली. गुजरातनेही अहमदाबादेत मुंबईला हरवले. मग बंगळुरूने चिन्नास्वामीवर पंजाबचा पराभव केला. बुधवारी हैदराबादनेही आपल्या घरच्याच मैदानावर मुंबईला पराभवाचा धक्का दिला होता. आतापर्यंत सात संघ आपल्या घरच्या मैदानावर जिंकले आहेत. फक्त लखनऊ, मुंबई आणि दिल्लीत सामने झालेले नाहीत आणि ते तीन संघही जिंकलेले नाहीत. येत्या 30 तारखेला लखनऊ तर 1 एप्रिलला मुंबई आपला घरच्या मैदानावर पहिला सामना खेळणार आहेत. यातही यजमानांचा विजय होतो की नाही ते कळेलच.

राजस्थान रॉयल्सने चोपल्या दहा षटकांत 127 धावा

पहिल्या दहा षटकांत जरी धावा निघाल्या नसल्या तरी रियान परागच्या झंझावातामुळे राजस्थानने चक्क 127 धावा चोपून काढल्या. त्यापैकी 92 धावा फक्त शेवटच्या सहा षटकांत ठोकून काढताना 15, 15, 15, 7, 15, 25 अशा धावा वसूल केल्या. परागने डावातील शेवटच्या षटकांत एन्रीक नॉर्कियाला 4, 4, 6, 4, 4, 1 अशा 25 धावा काढत संघाला अनपेक्षितपणे 185 धावांवर पोहोचवले. परागने आपल्या 45 चेंडूंच्या खेळीत 6 चौकार आणि 7 षटकारांची बरसात केली. त्याने 34 चेंडूंत आपली पन्नाशी साजरी केली होती, तर पुढील 11 चेंडूंत 3 षटकार आणि 3 चौकार खेचत 34 धावा काढल्या. शेवटच्या दहा षटकांत दिल्लीच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडताना त्याने रविचंद्रन अश्विन (29), ध्रुव जुरेल (20) आणि शिमरॉन हेटमायर (14) यांच्यासोबत छोटय़ा छोटय़ा का होईना महत्त्वपूर्ण भागीदाऱया रचत राजस्थानला आव्हानात्मक मजल मारून दिली.