सूर्यनमस्कार! ‘आदित्य एल-1’ झेपावले!! ‘इस्रो’ची ऐतिहासिक कामगिरी

‘चांद्रयान-3’ च्या यशानंतर हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने आणखी एका ऐतिहासिक मोहिमेच्या दिशेने आज यशस्वी पाऊल टाकले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून सकाळी 11.50 वाजता आदित्य एल-1 यान सूर्याच्या दिशेने झेपावले. 125 दिवसांनी आदित्य एल-1 नियोजित ठिकाणी पोहचणार आहे.

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘इस्रो’ने आखलेली ही मोहीम ऐतिहासिक आहे. हिंदुस्थानची अवकाशातील पहिली सौर वेधशाळा असलेल्या आदित्य एल-1 यानाला ‘पीएसएलव्हीसी 57’ रॉकेटच्या सहाय्याने पृथ्वीभोवती 235 कि.मी. बाय 19500 कि.मी.च्या अपेक्षित कक्षेत प्रस्थापित करण्यास इस्रोला यश मिळाले. दरम्यान, या मोहिमेला 400 कोटींचा खर्च झाल्याची माहिती आहे.

असा असेल प्रवास
पृथ्वीपासून सूर्य सुमारे 15 कोटी किलोमीटरवर आहे. सूर्याच्या बाह्य भाग फोटोस्फिअर येथील तापमान 5500 अंश सेल्सिअस असते, तर सूर्याच्या केंद्रबिंदूचे तापमान 1.50 कोटी अंश सेल्सिअस आहे. त्यामुळे कोणतेही यान सूर्याच्या जवळ जाऊ शकत नाही.
मात्र सूर्य आणि पृथ्वी यामध्ये लॅग्रेन्ज पॉइंट (बिंदू) आहेत. एल 1 ते एल 5 असे हे पॉइंट असून ‘आदित्य यान’ हे एल-1 पॉईंटपर्यंत जाणार आहे.
एल-1 पॉइंटचे अंतर पृथ्वीपासून 15 लाख कि.मी. आहे. तिथंपर्यंतच्या प्रवासासाठी ‘आदित्य’ यानाला 125 दिवस लागतील.
आदित्य एल-1 मोहीम अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. सूर्याचा परिणाम पृथ्वीवर नेमका काय होतो याचा अभ्यास केला जाईल.
सूर्याचे तापमान, सौर वादळे, ओझोन थर, हवामान, गुरुत्वाचा पृथ्वीवर होणारे परिणाम, वातावरण बदल याची माहिती आदित्य एल-1 मार्फत मिळणार आहे.

पंतप्रधान मोदींकडून ‘इस्रो’ वैज्ञानिकांचे अभिनंदन
‘चांद्रयान-3’ यशस्वी केल्यानंतर हिंदुस्थानने आपला अंतराळ प्रवास कायम ठेवला आहे. हिंदुस्थानच्या पहिल्या सूर्य मिशन, ‘आदित्य एल-1’ च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी ‘इस्रो’च्या आपल्या वैज्ञानिक आणि इंजिनीअर्स यांना शुभेच्छा. संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी ब्रह्मांडाला चांगले समजून विकसित करण्यासाठी आपल्या वैज्ञानिकांचे प्रयत्न जारी आहेत, असे ‘एक्स’वरील पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

‘प्रज्ञान’चा मूनवॉक; चंद्रावर ‘शतक’ पूर्ण!
‘चांद्रयान-3’ची चंद्राच्या दक्षिण धुवावर ‘मूनवॉक’ सुरू आहे. प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर 100 मीटर अंतर पूर्ण केले आहे. चंद्रावरील लँडिंग साईट शिवशक्तीपासून 100 मीटर दूरवर आता प्रज्ञान रोव्हरकडून संशोधन सुरू आहे. ‘इस्रो’ने चांद्रयान-3चे नवीन फोटो शेअर केले आहेत. यात प्रज्ञानचा मूनवॉक दाखविला आहे. चंद्रावर 14 दिवस रात्र आणि 14 दिवस उजेड असतो. जेव्हा चंद्रावर पूर्ण काळोख होतो तेव्हा प्रज्ञान रोव्हर व विक्रम लँडरचे काम थांबेल.