पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून मुकादमावर गोळीबार, जामखेड शहरातील घटना

दीड वर्षापूर्वी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मुकादमावर गोळीबार केल्याची घटना आज घडली. या घटनेमध्ये मुकादम जखमी झाला असून, दोघांवर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आबेद बाबुलाल पठाण (रा. गरडाचे पाटोदा) असे जखमी मुकादमाचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे (रा. गरडाचे पाटोदा) याच्यासह एका साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. आबेद पठाण हे ऊसतोड मुकादम आहेत. याच्याकडे लक्ष्मण कल्याण काळे (रा.जामखेड) हा ऊसतोड मजूर म्हणून कामाला होता. लक्ष्मण काळे याला आर्थिक कारणावरून दीड वर्षापूर्वी यातील आरोपी अक्षय मोरे याने मारहाण केली होती. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. याचा राग अक्षयच्या मनात होता. रविवारी मध्यरात्री एक वाजता आबेद पठाण यांना भेटण्यासाठी बोलवून त्यांच्यावर तीन राऊंड फायर केले. यामध्ये एक गोळी आबेद पठाण यांच्या पायाला लागल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळाहून फरार झाला आहे. याची माहिती जामखेड पोलिसांना मिळताच, तातडीने अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली. आरोपीच्या शोधासाठी तीन पथके तैनात करण्यात आली असून, लवकरच आरोपीला पकडण्यात येईल, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गौतम तायडे करत आहेत.

गोळीबार करणारा आरोपी गुन्हेगार पार्श्वभूमीचा

पाटोदा गरडाचे या ठिकाणी मुकादमावर केलेल्या गोळीबारातील आरोपी अक्षय मोरे हा पाच वर्षांपूर्वी जामखेड येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडातील अल्पवयीन आरोपी होता. तो या दुहेरी हत्याकांडातून निर्दोष सुटला होता. मोरे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पाटोदा गरडाचे येथे गोळीबाराची घटना घडली असून, फिर्यादीच्या पायाला गोळी चाटून गेली आहे. अक्षय मोरे हा हत्याकांड, दरोडा यातील आरोपी आहे. आरोपीच्या शोधासाठी जामखेड पोलिसांची तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. आरोपीला लवकरात लवकर पकडण्यात येईल तसेच आरोपीचा तडीपारीचा प्रस्ताव पाठवला आहे.
– प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, नगर