वाहनचालक विरुद्ध दिशेने गाडय़ा चालवतात, त्याला कोर्ट काय करणार?

mumbai-highcourt

कसारा घाटातील वाहतूककोडींच्या समस्येकडे लक्ष वेधणाऱया जनहित याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी निकाली काढल्या. घाटरस्त्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला. त्यावर वाहनचालक विरोधी दिशेने गाडय़ा चालवतात, त्याला न्यायालय काय करणार? वाहतुकीचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही बसलेलो नाहीत, असे खडे बोल सुनावत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना संबंधित प्राधिकरणाकडे दाद मागण्याचे निर्देश दिले.

मुंबईहून कसारा घाटमार्गे नाशिकला जाणाऱया महामार्गावर काही प्रवासी विरुद्ध दिशेने गाडय़ा चालवतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या मार्गावर नियमित लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात करावे आणि नियम मोडणाऱया वाहनचालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत डॉ. मंजुळा बिस्वास यांनी दोन जनहित याचिका दाखल केल्या होत्या. त्यांच्या याचिकांवर शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या मागण्यांना अनुसरून निर्देश देण्यास खंडपीठाने नकार दिला. वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत असतील तर त्यात न्यायालयाने लक्ष घालावे का? यासाठी प्रशासन आहे. आम्ही इथे वाहतुकीचे प्रश्न सोडवण्यासाठी बसलेलो नाहीत. याचिकाकर्त्यांनी संबंधित प्राधिकरणाकडे निवेदन द्यावे आणि प्राधिकरणाने त्यांच्या निवेदनाची दखल घ्यावी, असे स्पष्ट करत न्यायालयाने दोन्ही जनहित याचिका निकाली काढल्या.