देवगडमध्ये आढळले कातळशिल्प, विनोद बोभाटे यांचे सर्व स्तरातून कौतुक

कोकणावर निसर्गाने मुक्त उधळन केली आहे. विविध पर्यटन स्थळे तसेच एतिहासिक स्थळांचा वारसा कोकणाला लाभला आहे. आजही एतिहासिक दगडी कातळशिल्पे कोकणातल्या काही गावांमध्ये पहायाला मिळतात. तर काही इतिहास प्रेमींच्या माध्यामातून त्यांचा शोध घेतला जात आहे. शोध घेत असतानाच कणकवली तालुक्यातील नांदगाव आणि तोंडावली या दोन गावांच्या सीमेवर दोन वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्पे सापडली आहेत.

कणकवली तालुक्यातील रहिवासी दुर्गप्रेमी विनोद सुर्यकांत बोभाटे व त्यांचे मित्र हे दुर्गसंवर्धनाच्या कामात सक्रिय आहेत. दुर्गसंवर्धन आणि प्राचिन इतिहासाची आवड असणाऱ्या विनोद व त्याच्या मित्रांनी मिळून पुरातन अवशेषांचा शोध घ्यायला सुरुवात केली. शोधकार्य सुरू असताना त्यांना त्यांच्याच गावामध्ये काही पुरातन अवशेष सापडले. गावातील डोंगरावर त्यांना या वैशिष्ट्यपूर्ण पुरातन गोष्टी आढळून आल्या पण त्याचा नेमका अर्थ त्यांना काढता येत नव्हता. त्यामुळे त्यांनी रणजित हिर्लेकर यांची मदत घेतली. गेल्या आठवड्यात मुणगे येथे सापडलेल्या कातळशिल्पाची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे विनोदला रणजीत हिर्लेकर यांची माहिती मिळाली. रणजीत हिर्लेकर हे कोकण इतिहास परिषदेच्या केंद्रिय कार्यकारणीचे सदस्य आहेत. दिनांक 26 मार्च रोजी इतिहास संशोधन मंडळ व परिषदेच्या वतीने कातळशिल्पांचे रहस्य उलगडण्यासाठी नांदगाव येथे अभ्यास मोहीम सुरु करण्यात आली. रणजित हिर्लेकर यांनी या कातळशिल्पांचे छायाचित्रण व त्याचे आवश्यक मोजमाप घेतले आहे.

“या कातळशिल्पांना गावातील लोक पांडव फळी असे म्हणतात. या कातळशिल्पावर गवत वाढलेले असल्यामुळे या चित्रांचे नेमके आकलन होत नव्हते. सर्व साफसफाई केल्यानंतर या कातळशिल्पांची आकृती स्पष्ट होईल,” असे विनोद बोभाटे यांनी सांगितले.

या शोध मोहिमेत रणजित हिर्लेकर व अजित टाककर यांच्या समवेत विनोद सूर्यकांत बोभाटे, अभिजीत नाना बोभाटे, सुरज संतोष बोभाटे या स्थानिकांनी सक्रिय सहभाग घेतला. गावातील इतिहास उजेडात आणल्यामुळे विनोद बोभाटे यांचे सर्वत्र कौतूक केले जात आहे. गावात कातळशिल्पे सापडली आहेत. त्यामुळे आजुबाजुच्या परिसरात अजून काही महत्वाची प्राचीन अवशेष सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण इतिहास परिषद व देवगड इतिहास संशोधन मंडळ यांच्या वतीने आसपासच्या गावात शोध मोहीम राबवली जाणार आहे.