टी-20 क्रिकेट आणि राजकारणामुळे विंडीज क्रिकेट उद्ध्वस्त, क्रिकेटविश्वाला झाले दुःख

सत्तर-ऐंशीच्या दशकात क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या वेस्ट इंडीज क्रिकेट संघावर वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीतच ओढावलेली नामुष्की पाहून अवघे क्रिकेटविश्व दुःखी झाले आहे. ज्या संघाने वन डे क्रिकेटचे पहिले तीन वर्ल्ड कप गाजवले, त्या संघाशिवाय वर्ल्ड कप पाहावे लागणार, ही कल्पनाच अनेकांना पचत नाहीय. गेल्या दशकापासून पॅरेबियन क्रिकेटमध्ये पह्फावलेले अंतर्गत राजकारण आणि पैशांसाठी केवळ टी-20 क्रिकेटलाच प्राधान्य देण्याची विंडीज खेळाडूंच्या वृत्तीने वेस्ट इंडीजचं क्रिकेट संपवल्याची भावना व्यक्त होत आहे.

गेल्या दीड-दोन दशकापासून विंडीजचे क्रिकेट दिवसेंदिवस खालावत चालले होते. आता तर ते रसातळालाच पोहोचले आहे. एक काळ असा होता की, त्यांच्याकडे नैसर्गिक गुणवत्ता असलेले फलंदाज आणि गोलंदाजांची संपत्ती होती. जी पॅरेबियन क्रिकेट संघटनाच्या राजकारणाने उद्ध्वस्त केली आहे. हिंदुस्थानचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आपल्या ट्विटमध्ये विंडीजच्या राजकारणालाच ठोकले. तो म्हणाला, काय लाजिरवाणी गोष्ट आहे. विंडीजचा संघ वर्ल्ड कपसाठी पात्र ठरू शकला नाही. केवळ गुणवत्ता पुरेशी नाही, हे या पराभवाने दिसून आलेय. त्यासोबत एकाग्रता, चांगले संघ व्यवस्थापन आणि राजकारणमुक्त संघटना असायला हवी. एक समाधानाची बाब आहे की, यापेक्षा खाली विंडीज जाऊ शकत नाही, असे म्हणत सेहवागने आपला राग व्यक्त केला.

वेस्ट इंडीजच्या नामुष्कीला केवळ त्यांचे खेळाडूच जबाबदार आहेत. त्यांच्या खेळाडूंना देशासाठी खेळण्याचा जराही अभिमान नाही. त्यांना केवळ टी-20 क्रिकेटच्या लीगमध्ये खेळण्यातच आनंद मिळत असल्याची जोरदार टीका मदनलाल यांनी केली. विंडीज वर्ल्ड कपच्या बाहेर फेकला गेला, हे ऐकून मला जराही धक्का बसलेला नसल्याचे आकाश चोप्रा म्हणाला. गौतम गंभीरनेही या पराभवावर दुःख व्यक्त केले, तो म्हणाला, माझं वेस्ट इंडीजवर प्रेम आहे. मला आताही मनापासून वाटते की,  हा संघ नंबर वन बनू शकतो.