कवी अशोक लोटणकर यांना ‘कोकण साहित्य रत्न’ पुरस्कार

कोकण युवा प्रतिष्ठानच्यावतीने मुलुंडचे ज्येष्ठ साहित्यिक कवी अशोक लोटणकर यांना ‘कोकण साहित्य रत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले. लोटणकर यांना हा पुरस्कार कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी सचिव चंद्रकांत माने यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या वेळी कुष्ठरोग्यांसाठी काम करणारे पद्मश्री गजानन माने, लांजा-राजापूर तालुका विकास संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, नगरसेवक नंदू धुळे, आमदार राजन साळवी, कोकण युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय चाळके, सचिव विराज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

लोटणकर यांची कथा, कविता, ललित गद्य, बालवाङमय, समीक्षा, ब्रेल लिपी अशी 20 पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांच्या पुस्तकांना मान्यवर साहित्य संस्थांचे तसेच सामाजिक संस्थांचे 28हून अधिक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. लोटणकर बेस्टमधून आगार व्यवस्थापक म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात वाहून घेतले आहे.