ठाण्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे; मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात गँगवार

लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढत असतानाच ठाण्यात गुन्हेगारीचा कहर सुरू झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील तरुणाची निघृण हत्या वैशालीनगरमध्ये झाल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच गँगवॉर झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

ठाण्याच्या किसननगर भागात राहणाऱ्या अक्षय नार्वेकर उर्फ फाफड्या भाई आणि आकाश साबळे यांचे मुलुंड हद्दीतील एका चिकन सेंटरमधील मालकासोबत किरकोळ वाद झाले. तंदुरीचे पैसे न देण्याचा कारणावरून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या वादाचा राग मनात ठेवून रविवारी रात्री उशिरा आरोपींनी चिकन सेंटर येथे बोलावून दोघांवर चाकूने आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. दरम्यान, अक्षय नार्वेकर यांच्या डोक्यात घाव घातले. त्यानंतर तातडीने जुपिटर रुग्णालय दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, तर आकाश साबळे यांच्यावर उपचार सुरू असून त्याची तब्येत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आरोपींना रात्रीच उचलले
या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुलुंड पोलिसांनी एका रात्रीतच ठाण्याच्या किसननगर भागातील आरोपीचा शोध घेतला. यात इमरान खान (२७), सलीम खान (२९), फारुक बागवान (३८), नौशाद बागवान (३५) आणि अब्दुल बागवान (४०) या पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास मुलुंड पोलीस करीत आहेत.

पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी. किसननगरमधील स्थानिकांच्या उद्रेकातून हा हत्येचा प्रकार घडल्याची चर्चा होत आहे. दरम्यान, रविवारी रात्री दोघा तरुणांना ठाण्यातील जुपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिथे नागरिकांची प्रचंड गर्दी जमा झाली होती. एका किरकोळ कारणावरून झालेल्या वादामुळे वागळे इस्टेट भागात घबराटीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.