दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये भंगारातील ईव्हीएम मशीन; जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे केली पोलखोल

ईव्हीएम मशीनवरून आधीच संभ्रम असताना दादोजी काsंडदेव स्टेडियममधील एका गाळ्यात चक्क भंगारजमा झालेले ईव्हीएम, मतदान कार्ड सापडल्याने खळबळ उडाली आहे. 2014 पासून निवडणूकविषयक साहित्याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्याची पोलखोल केली आहे.

2014 पासून साठा करून ठेवलेल्या या साहित्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. आज अचानक आठवण झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱयांनी तलाठी, पोलीस, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही खोली उघडण्याचा प्रयत्न केला. गोदामात निवडणूकविषयक साहित्य असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ठाण्यात एकच चर्चा सुरू झाली. गंज लागलेल्या पेटय़ा उघडल्या असता त्यामध्ये बंद लिफाफे, मतदान ओळखपत्र आणि ईव्हीएम मशीन सापडले. या सर्व वस्तू भंगारात विकण्याचे आदेश देण्यात आले असताना निवडणूक अधिकाऱयांना आताच त्या गोदामांची आणि साहित्याची आठवण का झाली, असा संशय व्यक्त केला जात आहे.

निवडणूक प्रक्रियेचा काहीही संबंध नाही

यासंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी माहिती घेतली. या गोदामातील साहित्याचा व सध्याच्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेचा काहीही संबंध नसल्याचे शिनगारे यांनी रात्री उशिरा एक व्हिडीओ जारी करून जाहीर केले.