कमळाबाईने पाचर मारल्याने पालघर, ठाण्यात मिंधे गॅसवर

शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  पालघरात भारती कामडी तर ठाण्यातून राजन विचारे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरून प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र भाजपने पाचर मारल्याने मिंध्यांना या दोन्ही मतदारसंघांत अद्याप आपला उमेदवार जाहीर करता आलेला नाही. ठाणे, पालघरच्या जागेवर डोळा असलेल्या कमळाबाईने एकीकडे संजीव नाईक यांना पद्धतशीरपणे प्रचाराला लावतानाच दुसरीकडे पालघरमधून संभाव्य उमेदवार असलेल्या राजेंद्र गावित यांना आपण कमळ चिन्हावर लढण्यास इच्छुक असल्याची पुडी सोडायला लावली आहे. त्यातच आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले असल्याने मिंधे गटाची चांगलीच गोची झाली असून सत्तेच्या वाटय़ासाठी पळालेले गद्दार गॅसवर आहेत.

शिवसेनेशी गद्दारी केल्यानंतर खोके सरकारमध्ये सहभागी झालेल्या मिंधे गटाने लोकसभेला 25 जागा लढवू, अशी फुशारकी मारली होती. मात्र प्रत्यक्षात 9 जागा पदरात पाडताना मिंध्यांची दमछाक झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करतानाच पालघर आणि ठाणे लोकसभा मतदारसंघावर  अप्रत्यक्षपणे दावा ठोकला आहे. भाजपचे नेते अधूनमधून तसे वक्तव्यही करत असल्याने मिंधे गटाला या दोन्ही जागांवर आपला उमेदवार जाहीर करता आलेला नाही. काही दिवसांपूर्वी पद्धतशीरपणे खासदार राजेंद्र गावित यांच्या तोंडून त्यांना कमळ चिन्हावरच निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे वदवून घेतले आहे. तर दुसरीकडे मिंधे गट प्रताप सरनाईक यांना ठाण्यातून उतरवण्याच्या तयारीत असताना भाजपने माजी खासदार संजीव नाईक यांना भाईंदरमधून प्रचाराचा ‘श्रीगणेशा’ करण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे. मात्र यामुळे मिंधे गटाचे कार्यकर्ते पुरते गोंधळून गेले आहेत.

आता तरी निर्णय घ्या.. नाहीतर निवडणूक जड जाईल

ठाणे, भिवंडी आणि पालघर लोकसभेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 3 मेपर्यंत अंतिम मुदत असली तरी शनिवारी आणि रविवारी अर्ज स्वीकारले जाणार नसल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता तरी निर्णय घ्या.. नाहीतर निवडणूक जड जाईल, अशी गयावयाच मिंधे गटाकडून भाजपकडे केल्याची चर्चा आहे.

भिवंडीत 54 तर ठाण्यात 43 उमेदवारी अर्ज वाटप

भिवंडी प्रांताधिकारी कार्यालयात आज पहिल्या दिवशी 25 उमेदवारांना 54 उमेदवारी अर्ज वाटप करण्यात आले. ठाण्यातही 43 अर्ज इच्छुकांनी नेले. कल्याणमध्ये 37 अर्ज वाटप केले. मात्र यातील एकाही उमेदवाराने आपला अर्ज दाखल केलेला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली. उमेदवारी अर्ज तपासणी तसेच त्यासोबत जोडलेल्या अन्य कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.