वंचित मुलांच्या चेहऱयावर फुलले हसू!

वात्सल्य फाऊंडेशनचा अनोखा व्हॅलेंटाइन डे, 300 मुलांचा सामूहिक वाढदिवस केला साजरा

‘व्हॅलेंटाईन डे’चे आगळेवेगळे सेलिब्रेशन महालक्ष्मी येथील ‘दि वात्सल्य फाऊंडेशन’ या वंचित मुलांच्या निवारा केंद्रात नुकतेच पार पडले. फाऊंडेशनतर्फे 300 मुलांचा सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाने या सोहळय़ाची रंगत वाढली.

‘व्हॅलेंटाईन डे’ हा दिवस फक्त प्रियकर-प्रेयसीच साजरा करतात, या परंपरेला छेद देत गेल्या 31 वर्षांपासून ‘दि वात्सल्य फाऊंडेशन’ मध्ये सामूहिक वाढदिवस साजरा केला जात आहे. फाऊंडेशनच्या कार्यकारी संचालिका स्वाती मुखर्जी आणि केंद्रातील शिक्षिकांसोबत विद्यार्थ्यांनी त्यांचा सामूहिक वाढदिवस साजरा केला. विद्यार्थ्यांनी एकमेकांना गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा दिल्या. या अनोख्या वाढदिवसाला ‘सैराट’ फेम अभिनेत्री छाया कदम यांची उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाबद्दल स्वाती मुखर्जी सांगतात, ‘वंचित मुलांच्या निवारा केंद्रात येणारी मुले ही विविध सामाजिक स्तरांतून येतात. या मुलांना त्यांची जन्मतारीख माहिती नसते. आमच्या केंद्रातील मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही ‘प्रेम’ या शब्दाला साजेसा दिवस ठरवला तो म्हणजे 14 फेब्रुवारी. आम्ही दरवर्षी 14 फेब्रुवारीला या मुलांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करतो’.