महाराष्ट्रातही चंदा दो, धंदा लो सुरू; श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये 600 कोटींचा घोटाळा, संजय राऊत यांचे पंतप्रधानांना पत्र

निवडणूक रोख्यांसारखाच महाराष्ट्रातही ‘चंदा दो धंदा लो’ असा खेळ सुरू असून त्याचे सूत्रधार मिंधे सरकारचे बाळराजे श्रीकांत शिंदे आणि मंडळी असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज केला. श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून सामाजिक कार्याच्या नावाखाली बिल्डर, कंत्राटदारांकडून कोटय़वधी रुपये रोखीने वसूल केले जात असून आतापर्यंत अशा प्रकारे सुमारे 500 ते 600 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. या फाउंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

देशातील भ्रष्टाचार, काळ्या पैशांचे व्यवहार मोडून काढण्यासाठी आपण गेल्या दहा वर्षांपासून अथक परिश्रम करीत आहात. 2024च्या लोकसभा निवडणुकीतही आपण जनतेला तीच गॅरंटी दिली आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रातील काळा पैसा पांढरा करण्याचे व गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा समाजकार्याच्या नावाखाली ‘पांढरा’ करण्याचा एक धंदा मी आपल्या निदर्शनास आणत आहे, असे नमूद करत संजय राऊत यांनी या पत्रामध्ये श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या गैरव्यवहारांबद्दल पंतप्रधानांना अवगत केले आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. श्रीकांत शिंदे यांचा त्यांनी या वेळी सरकारचे बाळराजे असा उल्लेख केला. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा घोटाळा हा देशातील निवडणूक रोखे घोटाळ्यासारखाच आहे, असे ते म्हणाले. ज्येष्ठ वकील नितीन सातपुते यांनी या फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची माहिती ठाणे धर्मादाय आयुक्तांकडे माहितीच्या अधिकाराखाली रीतसर मागितली होती. मात्र धर्मादाय आयुक्तांनी ती दिली नाही, असे संजय राऊत म्हणाले.

धर्मादाय आयुक्त दबावामुळे राजीनाम्याच्या तयारीत

एक सामान्य नागरिक माहितीच्या अधिकाराखाली धर्मादाय आयुक्तांकडे माहिती मागत असताना ती का दिली जात नाही, असे काय रहस्य या फाउंडेशनच्या व्यवहारात दडले आहे. माहिती देऊ नये म्हणून धर्मादाय आयुक्त प्रचंड राजकीय दबावाखाली आहेत आणि ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत असल्याची माहिती मिळाली आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

कोटय़वधी रुपये देणारे दानशूर कोण

श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या खात्यात गेल्या काही वर्षांमध्ये 40 ते 50 लाखांची उलाढाल झाली आहे, पण गेल्या दीड वर्षात त्यांचा खर्च आणि घोषणा या कोटय़वधींच्या आहेत. हे सगळे पैसे कुठून आले, दानशूर कर्णाचे अवतार कोण आहेत हे महाराष्ट्राला कळले पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले.

बिल्डर, ठेकेदारांकडून 500 कोटी रोख उकळले

या फाउंडेशनसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष उघडण्यात आला असून त्या माध्यमातून बिल्डर, ठेकेदारांकडून रोखीत रकमा घेतल्या जातात. आतापर्यंत किमान 500 कोटी रुपये या माध्यमातून जमा केले आहेत, असाही आरोप संजय राऊत यांनी पत्रात केला आहे.

गद्दार आमदारांसाठी पैशांचा वापर

मुख्यमंत्री कार्यालयात बसून बिल्डर्स, कंत्राटदार यांना कंत्राटे दिली जातात. 3 हजार कोटींचे ऍम्ब्युलन्सचे कंत्राट बाळराजांच्या जवळच्या व्यक्तीच्या सुमित कंपनीला 8 हजार कोटींना दिले गेले. अशा प्रकारे रोखीने पैसा फाउंडेशनकडे वळवून गद्दार खासदार-आमदारांसाठी वापर केला जात आहे.