स्वीडनमध्ये दरवळला मराठी स्वरगंध

दिवाळीनंतर आलेली शनिवारची दुपार स्वीडनच्या मराठी रसिकांसाठी खास होती. महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोमच्या वतीने ‘स्वरगंध’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

‘सूर निरागस हो’  या गजाननाच्या चरणीच्या आर्जवाने ‘स्वरगंध’ मैफल सुरू झाली. गायक सौरभ रणदिवे यांनी हे गीत सादर केले. संत नामदेवांची ‘काळ देहांसी आला खाऊं’ व ‘माझे माहेर पंढरी’, संत तुकोबांचे ‘बोलावा विठ्ठल’, संत चोखामेळांचे ‘अबीर गुलाल’ आणि ‘येई वो विठ्ठले भक्तजन वत्सले’ अशी एकाहून एक सरस विठ्ठलगीते सौरभ रणदिवे, चंद्रशेखर पोठाळकर या द्वयींनी गायली आणि प्रेक्षक भक्तिरसात न्हाऊन निघाले. तबल्यावर सुव्रत आपटे यांनी अप्रतिम साथ दिली.

स्वप्ना शेटये यांनी ‘फुलले रे क्षण माझे’तून उत्तरार्ध फुलवत नेला. पुढे ओंकार इनामदार यांनी ‘प्रथम तुला वंदितो’ असे गात गणेशवंदनेने केलेली सुरुवात ‘जय गंगे भागीरथी’  ‘टाळ बोले चिपळीला’ अशा एकाहून एक सुश्राव्य स्वराविष्कारांनी खुलवत नेली.  कानडी मातृभाषा असणाऱया चंद्रशेखर यांनी मराठी अभंग गाऊन रसिकांना थक्क केले. पल्लवी भागवत यांच्या ओघवत्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.