‘पीएचडी’वरील विधानावर अजितदादांचं एक पाऊल मागे, दिलगिरी व्यक्त करत म्हणाले…

नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाली. यावेळी मराठा विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी जी फेलोशिप दिली जाते त्यातील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आली असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?’ असा उलट सवाल केला. यामुळे मोठा गदारोळ उडाला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही अजित पवारांच्या विधानावर नाराजी व्यक्त करत आंदोलन केले. हा वाद वाढत चालल्याचे पाहून अजितदादांनी एक पाऊल मागे घेत आपल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे.

गुरुवारी सकाळी विधान भवन परिसरामध्ये माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी पीएचडीबाबत विधान परिषदेमध्ये केलेल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो. अनेक जणांनी राजकीय नेत्यांवर पीएचडी केली आहे. त्याबाबत माझे दुमत नाही. अनेक जण विविध विषयामध्ये पीएचडी करतात, मात्र पीएचडी करताना विषयाचे गांभीर्य असायला हवे. जर्मन भाषेत पीएचडी केली तर अधिक फायदा होईल, असे अजित पवार म्हणाले.

पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याने संताप

विधानपरिषदेमध्ये काय घडलं?

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सारथीच्या माध्यमातून पीएचडी करण्यासाठी 200 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल, असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. ही संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावर अजित पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता ‘पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?’ अशी विचारणा केली. अजित पवार यांच्या धक्कादायक आणि बेजबाबदार वक्तव्याचा पीएचडीधारक विधार्थी तसेच सुशिक्षित तरुणांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आणि ते ट्रोल होऊ लागले.