पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याने संताप

राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच तापला आहे. त्यातच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी जी फेलोशिप दिली जाते त्यातील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आलीं असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?’ असा उलट सवाल केला. त्यांच्या या वक्तव्याने विद्यार्थी तसेच राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त केला जात आहे. पीएचडीधारक विद्यार्थ्यांची थट्टा करू नका, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले.

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सारथीच्या माध्यमातून पीएचडी करण्यासाठी 200 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल, असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. ही संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावर अजित पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता ‘पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?’ अशी विचारणा केली. अजित पवार यांच्या धक्कादायक आणि बेजबाबदार वक्तव्याचा पीएचडीधारक विधार्थी तसेच सुशिक्षित तरुणांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. विधान परिषदेतील या वक्तव्यामुळे अजित पवार समाजमाध्यमांवर ट्रोल होऊ लागले आहेत.

भवितव्यावर शंका घेऊ नये -रोहित पवार

n ज्या मुलांकडे क्षमता आहे, बुद्धिमत्ता आहे, पण पैसा नाही, म्हणून ही मुलं सरकारच्या स्कॉलरशिपवर शिकत असतील तर त्यांच्या भवितव्यावर शंका घेऊ नये. जी सरकारकडून मदत मिळणे अपेक्षित आहे ती मिळालीच पाहिजे, असे सांगत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या वक्तव्याचा निषेध केला.

नॉन ग्रॅज्युएटकडून दुसरी अपेक्षा करू शकत नाही

नॉन ग्रॅज्युएट उपमुख्यमंत्र्याकडून दुसरी अपेक्षा करू शकत नाही, असा टोला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे यांनी अजित पवार यांना लगावला आहे. सारथीच्या जाहिरातीत विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा घेण्यात येईल, असा कुठेही उल्लेख नव्हता. 1329 पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिप प्रदान करावी, अशी मागणी त्यांनी केली.

कोल्हापुरात विद्यार्थांकडून निषेध

पीएचडी अभ्यासक विद्यार्थी अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य गेटसमोर घोषणाबाजी करत अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

वक्तव्यातून सरकारचा माज स्पष्ट – नाना पटोले

अजित पवारांच्या वक्तव्यावरून या सरकारचा माज जो आहे त्यातून स्पष्ट होत आहे. आमच्या आदर्शाने शिक्षणाचा पाया रोवला आणि ज्या पद्धतीने अजित पवार यांनी वक्तव्य केले आहे त्यावरून हे सरकार शिक्षणाविरोधात आहे, असे कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.