Lok Sabha Election 2024 : भाजप नेत्याची मतदारांना धमकी! काँग्रेसची EC कडे तक्रार, कारवाईची मागणी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी भाजपचे नेते महेश शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जे आपले मानत नाहीत ते गद्दार असल्याचे म्हणत नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसने थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. महेश शर्मा यांच्यावर कारवाईची मागणी काँग्रेसने केली आहे.

‘जे मोदी आणि योगी यांना आपले मानत नाहीत, ते आपल्या वडिलांनाही आपले मानणार नाहीत. मोदी-योगी यांच्यापेक्षा ते तुमच्या जवळचे आहेत, असे कोणी म्हणत असेल तर तो या देशाचा गद्दार आहे. ती व्यक्ती देशाचे किंवा राज्याचे कल्याण इच्छित नाही’, असे वक्तव्य बुलंदशहरमध्ये एका निवडणूक रॅलीत शर्मा यांनी केले होते.

शर्मा यांनी पश्चिम उत्तर प्रदेशातील एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करत ही टिप्पणी केल्याचे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. एका वृत्तसंस्थेने 12 एप्रिल रोजी शर्मा यांच्या या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला होता. मात्र बुधवारी तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बिवी यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट करत कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यात त्यांनी लिहिलेय की, ‘प्रिय निवडणूक आयोग, वेळ आली आहे की तुम्ही नेमके कोणाचे आहात, हे ठरवण्याची वेळ आली आहे?’. ‘देशातील जो नागरिक मोदी-योगींना आपले मानत नाही तो आपल्या बापाला आपला बाप मानत नाही, अशी धमकी भाजप खासदार महेश शर्मा यांनी मतदारांना दिली आहे. यामुळे जर निपक्ष असाल तर कारवाई कराल. नाहीतर महेश शर्माच्या म्हणण्यानुसार तुम्ही फक्त मोदींचेच आहात’, असे श्रीनिवास बीवी यांनी म्हटले आहे.