मराठी माणूस आणि महाराष्ट्रापेक्षा मोदी शहांना प्रचार महत्त्वाचा, संजय राऊत यांची टीका

आंदोलनाच्या वणव्यात मराठवाडा अक्षरशः जळत असून, बीडमध्ये त्याची धग सर्वाधिक जाणवली. आमदार प्रकाश सोळंके आणि आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर जमावाने पेटवून दिले. माजलगाव नगरपरिषदेची इमारतही जाळण्यात आली. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर महाराष्ट्राची परिस्थिती ही देखील मणिपूरप्रमाणे होताना दिसत असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले. ज्याप्रमाणे मणिपूरकडे सरकारचे लक्ष नाही त्याच प्रमाणे महाराष्ट्राकडेही सरकारचे लक्ष नसल्याचे राऊत यांनी म्हटले. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी म्हटले की केरळमध्ये स्फोट झाल्यानंतर पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांपासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि नेत्यांपर्यंत सगळ्यांनी तिथल्या सरकारला दोष दिला. तिथले सरकार बरखास्त करण्याची मागणी केली. महाराष्ट्रात गेल्या 15 दिवसांपासून हिंसाचार, जाळपोळ सुरू असून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतंय. यावर ना पंतप्रधान बोलले, ना गृहमंत्री बोलले, ना भाजपचे अध्यक्ष बोलले. हे सगळे या प्रश्नावर मूग गिळून गप्प बसले आहेत.

संजय राऊत यांनी म्हटले की, “मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण हा आता एका राज्याचा विषय नसून हा देशाचा विषय बनला आहे. हा राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री पाच राज्यात गुंतून पडले आहे. तो गुंता बाजूला ठेवून महाराष्ट्रातील आग विझवावी. जरांगे यांचे प्राण, महाराष्ट्रातील सार्वजनिक मालमत्ता यापेक्षा 5 राज्यांतील निवडणुका, प्रचार महत्त्वाचा वाटतो आहे ? ते जरांगे पाटीलांचे प्राण वाचवण्यासाठी 1 तास देऊ शकत नाही ? महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा सूड घेण्याचा एक प्रकारे प्रयत्न आहे. “