मायमराठीचा आज जागर; स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा विशेष सोहळा, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार

मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी संस्कृती टिकवण्यासाठी सदैव झटणाऱया स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिवसाचे निमित्त साधून मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात उद्या विशेष सांस्कृतिक सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना या सोहळय़ात अभिवादन करण्यात येणार आहे. यानिमित्त मायमराठीचा डोळय़ांचे पारणे फेडणारा जागर अनुभवता येणार असून, या सोहळय़ात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे.

कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिवस’ म्हणून साजरा केला जातो. शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडूनही दरवर्षी मराठी भाषा दिवस सोहळय़ाचे आयोजन केले जाते. यंदाही उद्या 27 फेब्रुवारी रोजी मुंबई रुग्णालयाजवळील बिर्ला मातोश्री सभागृहात सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचीही उपस्थिती राहणार आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत हेदेखील यावेळी पदाधिकाऱयांना संबोधित करणार आहेत. या सोहळय़ाला शिवसेना पक्षाचे सर्व नेते, सचिव, उपनेते, खासदार, आमदार, विभागप्रमुख, विभागसंघटक, माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.

मराठी भाषा दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी स्थानीय लोकाधिकार महासंघाचे अध्यक्ष शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, सरचिटणीस प्रदीप मयेकर, कार्याध्यक्ष आमदार विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महासंघाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत.

स्थळ – बिर्ला मातोश्री सभागृह, मरीन लाईन्स
वेळ – सायंकाळी 5 ते रात्री 9
असा रंगणार सोहळा
मराठी भाषेची सद्यस्थिती, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, मराठी भाषा संवर्धनासाठी लोकाधिकार महासंघाची भूमिका आणि भविष्यातील वाटचाल याबाबत ऊहापोह करण्यात येणार आहे.
सोहळय़ात सुप्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे यांचा ‘मोगरा फुलला’ हा सांगितिक कार्यक्रम सादर होणार आहे.