दुकानावर मराठी पाटी हवीच! 3040 जणांना नोटीस, 2136 जणांना कोर्टात खेचले

सर्वेच्च न्यायालयाने दुकाने-आस्थापनांवरील पाटय़ा मराठी करण्यासाठी दिलेली मुदत संपल्यामुळे पालिकेने सुरू केलेली कारवाई वेगाने सुरू असून आतापर्यंत 87 हजार 47 दुकानांची झाडाझडती घेतली. 3040 जणांना नोटीस बजावली असून 2116 जणांना कोर्टात खेचले.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मार्च 2022ला दुकाने-आस्थापनांवरील नामफलक मराठी भाषेत आणि ठळकपणे लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार दुकाने-आस्थापनांवरील पाटय़ा मराठीत लावण्यासाठी दिलेली अखेरची मुदत 25 नोव्हेंबर 2023 रोजी संपल्यानंतर पालिकेच्या दुकाने-आस्थापने विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. मराठी पाटी नसल्यास कायद्यानुसार प्रतिकामगार दोन हजार याप्रमाणे जास्तीत जास्त एक लाखापर्यंतचा दंड होणार आहे. पालिकेने आतापर्यंत केलेल्या कारवाईत 30 लाख 37 हजार 500 रुपयांचा दंडही वसूल केला आहे.

सात लाख दुकानांना निर्देश

मुंबईत सुमारे सात लाख दुकाने-आस्थापने असून त्यांना हा नियम पाळणे बंधनकारक आहे. पालिकेच्या तपासणीत मराठी पाटी नसल्यास कारवाई करण्यात येईल.

बारला महान व्यक्ती, गडकिल्ल्यांचे नाव नको!

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम 2022तील कलम 36 ‘क’ (1)च्या कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला लागू असलेल्या कलम-7 नुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक आहे. यानुसार मद्यविव्रेत्या दुकानांनाही महान व्यक्ती किंवा गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत, असे निर्देशही दिले आहेत.