सीरिया, पाकिस्तानच्या मार्गावर हिंदुस्थान; लोकं बंदुका हाती घेण्यास तयार! मेहबुबा मुफ्तींच्या विधानानं वाद

जम्मू आणि कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी गुरुवारी देशातील सद्य परिस्थितीची तुलना पाकिस्तान आणि सीरियाशी केली. यावेळी त्यांनी ईशान्येकडील राज्यामधील परिस्थिती आणि अन्य राज्यातील घटनांचा उल्लेख करत ‘हिंसाचार’ वाढल्याचं अधोरेखित केलं. त्या म्हणाल्या, ‘लोक बंदुका हाती घेत आहेत आणि एकमेकांना मारत आहेत. जे हिंदुस्थानने आतापर्यंत कधीही पाहिलेलं नाही’. त्याच्या याविधानावरून वाद निर्माण झाला आहे.

मुफ्ती म्हणाल्या की ‘ते सर्वत्र किती द्वेष पसरवत आहेत ते तुम्ही बघू शकता. सामान्य लोक एकमेकांना मारण्यासाठी बंदुका उचलायला तयार आहेत. अशी परिस्थिती आम्ही पाकिस्तानात पाहिली आहे. सीरियातही असंच काही घडलेलं दिसतं आहे. आता आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे?’, असा सवाल त्यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीवेळी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच देशाला अशा परिस्थितीत ढकलल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ‘लोक एकमेकांना मारण्यासाठी बंदुका बाळगतात’, असंही त्या म्हणाल्या.

त्याचवेळी ‘अखेर प्रेमाचा द्वेषावर विजय होईल’, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

INDIA आघाडीच्या स्थापनेवर भाष्य करताना मुफ्ती म्हणाल्या, ‘ही गोडसेंचा हिंदुस्थान आणि गांधी, नेहरू आणि सरदार पटेल यांनी साकारलेल्या हिंदुस्थानच्या कल्पनेतील हिंदुस्थानची लढाई आहे. भाजपला गोडसेचा हिंदुस्थान घडवायचा आहे. मला वाटते की INDIAची युती कारणासाठी लढत आहे आणि राहुल गांधी धर्मांधतेविरुद्धच्या या लढ्याचे नेतृत्व करतील’.

विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी भाजप सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

विरोधी पक्षांसाठी ही स्थिती आव्हानात्मक असल्याचंही त्या म्हणाल्या. INDIA ला फक्त भाजपच नाही तर सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो सारख्या एजन्सींना देखील सामोरे जावं लागणार आहे’, असंही त्यांनी सांगितलं.

मुफ्ती यांच्या याविधानानंतर सत्ताधाऱ्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.