मनसे भाजपच्या दावणीला; चौदा तासांच्या प्रतीक्षेनंतर राज ठाकरेंना मिळाली अमित शहांची भेट

राज्यातील सर्व बडय़ा नेत्यांना आणि कलाकारांना ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी चर्चेला बोलावणारे मनसचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लोकसभेच्या जागांसाठी अखेर दिल्ली दरबारी आज हजर व्हावे लागले. चौदा तासांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज ठाकरे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट मिळाली. या चर्चेअंती दोन जागा मनसेला देण्यात येणार असल्याचे समजते.

लोकसभेतील जागावाटपाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांना दिल्लीत बोलावण्यात आले. राज ठाकरे, त्यांचे पुत्र अमित ठाकरे व मनसेचे नेते सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. त्याच रात्री दहा वाजता अमित शहांसोबत त्यांची भेटीची वेळ ठरली होती, पण अमित शहा अन्य बैठकांमध्ये व्यस्त असल्याने राज ठाकरे यांना भेट मिळाली नाही. अखेर दुपारी अमित शहा यांनी राज ठाकरे यांना भेट दिली. या भेटीतील चर्चेअंती  दक्षिण मुंबई आणि नाशिक किंवा शिर्डी असे दोन मतदारसंघ मनसेला देण्यावर तडजोड झाल्याचे सांगण्यात येते.

 भाजपच्या विरोधात तरीही

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने दहा जागांवर उमेदवार उभे केले होते, पण मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. 2019 मध्ये मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. पण मनसेने 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या विरोधात थेट प्रचार केला होता. मागील लोकसभा निवडणुकीत मनसेचा उमेदवार निवडणूक रिंगणात नव्हता. पण भाजपच्या विरोधात ‘लाव रे तो व्हिडीओ’ असा प्रचार केला होता.  आता भूमिका बदलत मनसेने हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्याने महायुतीत समावेश होण्याची चिन्हे आहेत.