मोनेगिरी- विनायक आणि इंदिरा

>>संजय मोने

प्रेमाची व्याख्या करता येत नाही आणि ते चौकटीत बांधता येत नाही. असा हा थोडा खट्टा थोडा मीठा असा प्रेमाचा सहवास जगलेल्या, आयुष्याचा निखळ आनंद घेणाऱया विनायक आणि इंदिरा यांची ही गोष्ट.

आता दोघेही या जगात नाहीत. असते तर साधारण शंभरी पार असते. त्यांची गोष्ट म्हणून काही तीस-चाळीस वर्षे जुनी नाही. कारण विनायक आणि इंदिरा दोघांनाही अत्यंत निरोगी असं दीर्घायुष्य लाभलं होतं. मैदानाच्या कट्टय़ावर दोघेही सकाळचा फिरायचा व्यायाम करून मस्त टेकलेले असायचे. जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांच्या वयाचा अंदाज करणं कठीण होतं. सगळ्यांना ते दोघं ओळखायचे. आमचा एक बारा-चौदा जणांचा चमू होता. सगळे आपापला व्यायाम वगैरे करून कट्टय़ावर विसाव्याला येत असू. त्यानंतर खच्चून गप्पा, सगळ्या जगाला उरलेल्या शिव्या वगैरे देऊन झाल्या की आम्ही आपापल्या व्यापासाठी निघून जायचो. एकदा माझ्या प्रयोगाला विनायक आणि इंदिरा दोघेही आले होते. मला अर्थात माहीत नव्हतं. प्रयोग संपल्यावर आत आले. हातात एक छान खोका होता.

“माझ्या मुलीने पाठवलंय. आम्ही थोडंसं खाल्लंय. घे. छान झाला तुमचा प्रयोग. मजा आली.” विनायक म्हणाले. अर्थात त्याचं नाव त्या क्षणापर्यंत मला माहीत नव्हतं.
“मी विनायक राजे आणि ह्या इंदिरा राजे. मी ह्यांचा नवरा.”
“अहो. काय बोलताय! संजय… मी ह्यांची बायको.” इंदिरा संकोचाने म्हणाल्या.
“खोटं बोलायची हिची सवय अजून जात नाही, संजय! मी हिचा नवरा बरं का!” विनायक ठासून म्हणाले. तितक्यात एक जोडपं त्यांना शोधत आलं.
“पप्पा! अहो, मी बाहेर शोधत होते.”
“बरं का संजय. ही आमची सून होती. आता मुलगी आहे. ए जावई! इकडे ये. हा मूळचा माझा मुलगा, पण सून मुलगी झाली. त्यामुळे मुलाला जावई म्हणतो आम्ही.” ह्यावर इंदिरा आणि विनायक दोघेही खुदुखुदू हसले. नात्याला काय नक्षीदार मुरड घातली होती त्यांनी, नाहीतर सासू-सून नात्यात कोणीतरी किंवा दोघीही नात्याला नाही तर नाकाला मुरड घालतात.

दुसऱया दिवशी सकाळी मी आमच्या कट्टय़ावर आलो आणि कालचा प्रसंग आमच्या लोकांना सांगितला. सगळे अवाक् झाले. एकजण म्हणाला-
“च्यायला! असं पाहिजे यार! काय दृष्टिकोन आहे. आजपासून ते दोघं पप्पा आणि मम्मी!”
आम्ही त्यांना त्या दिवसापासून पप्पा-मम्मी म्हणायला लागलो आणि त्यांच्याशी आवर्जून गप्पा मारायला लागलो. एकदा मी आलो नव्हतो तेव्हा पप्पा मिठाईचा खोका घेऊन पेढे वाटत होते.
“साठीचे पेढे!” असं त्यांनी आमच्यातल्या एकाला सांगितलं
“आयला! फक्त साठ! त्या मानाने तुम्ही म्हातारे दिसता.” या आमच्या मित्राला पोच जरा कमीच होता आणि आहे. त्याच्या लग्नासाठी एक स्थळ आलं होतं तेव्हा, “साला आमचं मागचं तुटलं म्हणून तुमच्या मुलीला होकार देतोय. स्पष्ट सांगतो, नंतर वाद नको.” असं त्याने तोंडावर सांगितलं. आता अजून तो एकटा आहे आणि इथून पुढे लग्न होईल असं वाटत नाही. असो.
पप्पा म्हणाले, “अरे! आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे साठावा. त्याचे पेढे!”
“म्हणजे तुमचं वय किती?”
मित्राचा वासलेला ‘आ’ बघून पप्पांनी त्याच्या तोंडात पेढा कोंबला.
“शंभरला तेरा कमी. आणि इंदू माझ्यापेक्षा अकरा दिवसांनी मोठी.”
पप्पा आणि मम्मी दोघांचं वय सत्त्याऐंशी होतं ते त्या दिवशी आम्हाला कळलं. मम्मी साध्या पण उंची सुती साडय़ा नेसायच्या आणि पप्पा मात्र ऐटबाज इस्त्राrची विजार, त्यावर उत्तम जुळणारा शर्ट. बाह्या दुमडलेल्या नाहीत. शिवाय कफ लिंक्स, गळ्याभोवती मफलर (तोही रोज वेगळा). फेऱया घालताना पप्पा मागे असायचे आणि मम्मी पुढे फिरायच्या. त्यांना कारण विचारलं तर म्हणाले होते, “इंदुताई जरा धडपडी आहे ना. म्हणून मागे राहून लक्ष ठेवायला लागतं.”

त्यावर मम्मी खवळून म्हणाल्या-
“कोण धडपडय़ा ते बघायचंय?” असं म्हणून मम्मीने चक्क पप्पांच्या विजारीचा पाय वर केला.
“हे बघ. खुणा बघ. मोज.” आणि त्या मस्त खुदुखुदू हसल्या.
“कोणीतरी कधीतरी या जगातून जाणार ना? माझ्या आधी ही जावी असं मला वाटतं. म्हणून हिने पुढे फिरत जावं असं मला वाटतं.”
मम्मीने पप्पांचा हात घट्ट पकडला. “हे नेहमी असं बोलतात. मी आधी गेले तर मागे ह्यांचं काय होईल?”
“काही होणार नाही. मला सगळा स्वयंपाक करता येतो. पण हिला ऑनलाइन व्यवहार करता येत नाहीत.”
“स्वयंपाक येतो? पापड केले होते एकदा अनेक वर्षांपूर्वी तेव्हा पापडखार घालायच्या ऐवजी पिठीसाखर घातली होती.”
पप्पांनी इंदूताईच्या हातावर हलकेच चापट मारली.
“पण फुकट नाही ना गेले ते पापड. पुढे दुधात बुडवून सगळे संपवले ना आपण!”

तितक्यात एक तरुण जोडपं येऊन पाया पडलं म्हणून आम्ही सटकलो. विलक्षण होते दोघंही. त्या दोघांना भेटायला कायम तरुण मुलं-मुली किंवा जोडपी यायची. का? ते पुढे कळलं. कट्टय़ावर तरुण प्रेमिक जोडय़ा बसायच्या. त्यांच्यात वाद व्हायचे. कुरबुर व्हायची. ते सगळं पप्पा आणि मम्मी मिटवायचे, आणि लग्नानंतर पाया पडायला यायचे. मम्मी आणि पप्पांच्या हातात जवळपास रोज सोनचाफ्याची फुलं असायची. कोणा ना कोणाचा तरी वाढदिवस असायचा. तो मम्मीच्या पक्का लक्षात असायचा म्हणून तो सोनचाफा.

पप्पा आयुष्यभर फिरतीच्या नोकरीत होते. मोठय़ा पदावरून निवृत्त झाले. मुलं परदेशात. हाताशी उत्तम पैसा होता. त्याचा उत्कृष्ट उपभोग दोघांनी शेवटपर्यंत घेतला. कधीतरी सकाळी त्यांच्या हातात पुडकी असायची, खाण्याची. त्याचं वाटप व्हायचं. महाग पदार्थ असायचे.
“अरे, सुरुवातीला गावोगावी फिरायचो, खाण्यापिण्याचे हाल व्हायचे. चहा मिळायची मारामार. बाकी विचारूच नकोस. मी चहावाल्याला विचारायचो, अरे बाबा! हा जो टोस्ट आहे तो तीनचार दिवसांपूर्वीचाच आहे ना? त्यावर तो म्हणायचा, हो साहेब, एकदम ताजा!” आणि मग ते खळखळून हसायचे.

कायम हसरा चेहरा हे त्या दोघांचं वैशिष्टय़ होतं. शिवाय आजूबाजूला फिरणाऱया सगळ्यांचं त्यांना कौतुक होतं. सुदैवाने बारीकसारीक वयोपरत्वे होणारी दुखणी सोडल्यास तब्येत ठणठणीत होती दोघांची. नव्वदीच्या पार वाटचाल सुरू होती. कट्टय़ावरच्या सगळ्यांना पप्पा आणि मम्मीचा आधार आणि दिलासा होता. काही जण आमच्यातले देवाघरी गेले. पप्पा आणि मम्मीच्या मानाने तरुण होते.

“वय होतं का त्याचं जायचं? आम्हाला न्यायचं ना! सगळं झालंय दोघांचं. तृप्त आहोत आम्ही.” मम्मी कळवळून म्हणाल्या.
एकदा संध्याकाळी कट्टय़ावर आम्ही सगळे आलो होतो. पाहतो तर पप्पा आणि मम्मीचा सगळा परिवार हजर होता. मुलगी, जावई, मुलगा, सून, नातवंडं.
“आज आमचा दोघांचा वाढदिवस आम्ही एकत्र साजरा करायचा असं ठरवलं. हे सगळे असतात परदेशात, तुम्ही नेहमीचे आहात, म्हणून आज आपण सगळ्यांनी जेवायला जायचं.”
पंधरा-वीस जण जेवायला गेलो. गप्पा मारल्या, उत्तम वेळ घालवला.
“हा आमचा शेवटचा वाढदिवस बरं का!” पप्पा शांतपणे म्हणाले.
“असं कसं! आता सेन्चुरीला किती वेळ राहिलाय?”
“नको. शंभर झाले तर मग तुम्ही दोनशेचा आग्रह कराल.” यानंतर एक नेहमीचं स्मितहास्य.
त्यानंतर एकदोन दिवसांनी पप्पा आणि मम्मी दिसले नाहीत. म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या मुलाने दरवाजा उघडला. घरात विचित्र शांतता होती.
दोघेही गैरहजर होते म्हणून चौकशीसाठी आलोय, असं सांगितलं.
“दोघेही कालच गेले. सकाळी मम्मी गेल्या आणि त्यानंतर पप्पा म्हणाले, आता मलाही जायला हवं. इंदू एकटी कशी राहील? असं म्हणून रात्री झोपले ते सकाळी उठलेच नाहीत.”
आमच्या अंगावर काटा आला. विलक्षण प्रकार होता तो. इतकं प्रेम. आणि…आणि काय बोलणार! त्या दिवसापासून आमचा कट्टा पोरका झाला.
[email protected]