हा मृतदेह माझ्या बहिणीचा नाही! सना खानच्या भावाच्या दाव्यामुळे गूढ वाढले

महाराष्ट्रातील नागपूर (Nagpur) येथील भाजप (BJP) नेत्या सना खान (Sana Khan ) यांच्या हत्येनंतर पोलिसांना सनाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. मृतदेहाच्या शोधासाठीच्या बचाव पथकाने हिरण नदीत शोधमोहीम राबवली , मात्र त्यांना मृतदेह सापडला नाही.  यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली.  या हत्याकांडात आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दुसरीकडे, हरदा येथे सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. यावेळी सनाच्या भावाने हा मृतदेह त्याच्या बहिणीचा नाही असे सांगितले त्यामुळे सनाचा मृतदेह कुठे आहे आणि सापडलेला मृतदेह कोणाचा आहे असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

या हत्येचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाचेचे दोन अधिकारी जबलपूरमध्ये तळ ठोकून आहेत. पुरावे गोळा करण्यासाठी नागपूरचे फॉरेन्सिक पथकही जबलपूर शहरात आले आहे. हे पथक आरोपी अमित साहूचे घर , ढाबा आणि कारची तपासणी करणार आहेत .

भाजपची नागपूरमधील स्थानिक नेता असलेली सना खान 1 ऑगस्ट रोजी नागपूरहून जबलपूरला निघाली होती . 2 ऑगस्ट रोजी सकाळी ती तिचा पती अमित उर्फ पप्पू साहू याच्या बिल्हारी राजुल टाऊन येथील घरी पोहोचली होती. येथे पोहोचल्यानंतर सनाचा पती अमित साहूसोबत वाद झाला होता. या वादातून अमित साहूने सनाची हत्या के ली . हत्येनंतर अमितने राजेश सिंग या त्याच्या साथीदाराच्या मदतीने मृतदेह हिरण नदीत फेकून दिला. या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या पोलिसांनी मृताचा पती अमित आणि त्याच्या साथीदाराला अटक करून त्यांची कसून चौकशी केली.

चौकशीदरम्यान आरोपीने खून केल्याचे कबूल केल्यानंतर मृतदेह नदीत फेकल्याचे सांगितले होते.  यानंतर 12 ऑगस्टपासून नागपूर आणि जबलपूर पोलीस मृतदेहाच्या शोधात गुंतले होते , मात्र मृतदेहाचा कोणताही सुगावा न लागल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली. या खून प्रकरणात सना खानचा मृतदेहही अद्याप सापडलेला नाही  आणि तिच्या मोबाईल व बॅगचाही कोणता सुगावा लागलेला नाही. यामुळे नागपूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्यासाठी त्याच्या बिल्हारी येथील घराची फॉरेन्सिक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सना खानचा भाऊ म्हणाला माझ्या बहिणीचा मृतदेह नाही 

 मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात आठ दिवसांपूर्वी एका विहिरीत मृतदेह सापडला होता . आठ दिवस उलटूनही मृतदेहाची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी शवविच्छेदन केल्यानंतर हा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवण्यात आला आहे.  नागपूरच्या भाजप नेत्या सना खान यांचा मृतदेह सापडला नसल्याने हरदा जिल्ह्यात सापडलेला हा मृतदेह सना खान हिचा असावा असा अंदाज वर्तवण्यात येत बोता.  सना खानच्या कुटुंबियांना मृतदेहाची ओळख पटविसाठी बोलावण्यात आले होते. हे कुटुंब नागपुरातून हरदा येथे पोहोचले होते.  मृतदेह पाहिल्यानंतर सनाचा भाऊ मोहसीन याने हा मृतदेह आपल्या बहिणीचा नसल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रात राहणारी आणि भाजप अल्पसंख्याक मोर्चाची सरचिटणीस असलेली सना खान नागपूरहून जबलपूरला पोहोचली होती. सना खानचा पती अमित साहू जबलपूरमध्ये ढाबा चालवतो. सना ही पती अमितची बिझनेस पार्टनर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला. यामुळे अमितने सनाचा खून करून मृतदेह नदीत फेकून दिला असा पोलिसांना संशय आहे.