संगीत कारंजे, खुला रंगमंच, दिव्यांग मुलांसाठी खेळणी, जोगेश्वरीतील शिल्पग्राम उद्यानात मुलांची दे धम्माल

वाढत्या उन्हामुळे होणारी काहिली दूर करण्यासाठी आणि बच्चे पंपनीला लागलेल्या सुट्टीचा आनंद मनमुराद घेण्यासाठी जोगेश्वरी पूर्वेकडील मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम उद्यान लहान मुले आणि पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. उद्यानातील संगीतमय कारंजे, खुला रंगमंच, दिव्यांग मुलांसाठी खेळणी, आकर्षक पायवाटा, शोभिवंत झाडे, नृत्य अशा विविध सुविधांमुळे सुखद गारव्याबरोबर शारीरिक, मानसिक थकवा गायब करून उत्साह वाढवला जातोय. या ठिकाणी रोज हजार मुले, पर्यटक दररोज हजेरी लावतात तर सार्वजनिक सुट्टीसह शनिवार-रविवारी ही संख्या आणखी दोन हजारांनी वाढते. दरम्यान, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना उद्यानात मोफत प्रवेश असून महाराष्ट्रासह देशाच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडवणारे 12 बलुतेदार हे पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे, अशी माहिती पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

 शिल्पग्राम उद्यानाचे क्षेत्रफळ 55 हजार चौरस मीटर असून महाराष्ट्राच्या व देशाच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडवणारे हे उद्यान आहे तसेच संगीत, नृत्य, मुक्त संवाद, चर्चासत्र, सभा इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी किमान 500 व्यक्ती बसू शकतील, असा खुला रंगमंच उद्यानात उपलब्ध आहे. दरम्यान, उद्यानात प्रौढांसाठी 10 रुपये तर 12 वर्षांखालील मुलांसाठी 5 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येते. उद्यान बुधवार वगळता सकाळी 6 पासून रात्री 10 वाजेपर्यंत खुले असते.

उद्यानाचे वैशिष्टय़!

n उद्यानात हिरवळीसह बहावा, ताम्हण, सोनमोहर, चाफा, पैलाशपती, कांचन अशी फुलेझाडे असून वेली, झुडपांनी उद्यानाच्या  सौंदर्यात भर घातली आहे. n विविध रंगातून संगीताच्या तालावर चालणारे संगीतमय कारंजे या उद्यानात उपलब्ध आहे. n आकर्षक पायवाटा व वॉकिंग ट्रक्स ः शिल्पग्राममधील विस्तीर्ण भागात फिरताना विविध ठिकाणे जोडणारे वॉकिंग ट्रक्स व आकर्षक पायवाटा बांधण्यात आल्या आहेत. n गजिबो आणि आसनव्यवस्था ः शिल्पग्राममध्ये विविध ठिकाणी बसण्यासाठी आसनव्यवस्था व विविध आकाराचे गजीबो उभारण्यात आले आहेत.