नाडाचा राडा अन् बजरंग बळी; डोपिंग टेस्ट न केल्याने नाडाने केले बजरंग पुनियाला निलंबित

डोपिंग टेस्ट न केल्याने हिंदुस्थानचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनियाला ‘नाडा’ने (राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्था) अनिश्चित काळासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेत मोठा राडा घातला आहे. मात्र गेले दीड वर्ष राष्ट्रीय कुस्ती महासंघाविरुद्ध केले जात असलेले आंदोलन आणि सरकारला परत केलेल्या ‘पद्मश्री’मुळे बजरंगचा बळी घेतला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ‘नाडा’च्या या राडय़ानंतर बजरंगनेही दंड थोपटले असून आपल्याला मुदत संपलेली किट देण्यात आली होती म्हणून आपण चाचणीला नकार दिला, असा दावा त्याने केला आहे. काहीही असले तरी या प्रकरणामुळे जुलैत होणाऱया पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी या हिंदुस्थानी कुस्तीपटूला मोठा धक्का बसलाय.

सोनीपत येथे झालेल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेदरम्यान बजरंग पुनियाने लघवीचे नमुने देण्यास नकार दिला. त्यामुळे ‘नाडा’ने ही   माहिती जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेला (वाडा) कळविली. मग बजरंगने चाचणीला नकार का दिला? यासाठी त्याला नोटीस पाठविण्याची सूचना ‘वाडा’ने ‘नाडा’ला केली. त्या पार्श्वभूमीवर ‘नाडा’ने 23 एप्रिलला बजरंगला नोटीस पाठवून 7 मेपर्यंत उत्तर मागितले आहे. जोपर्यंत बजरंगबाबत अंतरिम निर्णय होत नाही तोपर्यंत तो कुठल्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 65 किलो गटात खेळण्याचे बजरंग पुनियाचे स्वप्न होते, मात्र, त्याच्या या स्वप्नांना आता सुरुंग लागताना दिसत आहे.

मी चाचणीला विरोध केलेला नाही

बजरंगने अद्याप नोटिसीला उत्तर दिले नसले तरी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्याने लिहिले की, ‘मी कधीही ‘नाडा’च्या अधिकाऱयांना नमुने देण्यास नकार दिलेला नाहीये. त्यांनी मला लघवीचे नमुने देण्यासाठी मुदत संपलेली किट दिली होती. त्यामुळे मला अशी किट देणाऱयावर काय कारवाई केली, ते आधी ‘नाडा’ने स्पष्ट करावे. त्यानंतर खुशाल माझे नमुने घ्यावेत.’ याप्रकरणी माझे वकील विदुष सिंघानिया उत्तर देतील, असेही पुनियाने स्पष्ट केले आहे.

सोनीपतला काय घडले…?

पॅरिस ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपूर्वी सोनीपत येथे झालेल्या पात्रता स्पर्धेत बजरंग पुनियाला 65 किलो गटाच्या उपांत्य लढतीत रोहितने 9-1 गुणफरकाने लोळविले होते. या लढतीत पराभूत झाल्याने बजरंग रागातच ‘साई’ पेंद्रातून निघून गेला होता. आम्ही बजरंगची डोपिंग टेस्ट घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याने प्रतिसाद दिला नाही, असे ‘नाडा’च्या अधिकाऱयांचे म्हणणे आहे, मात्र आपल्याला मुदत संपलेली किट दिल्याने आपण चाचणीसाठी नमुने दिले नाहीत, असे बजरंग पुनियाचे म्हणणे आहे. आता हे प्रकरण पुढे कुठल्या वळणावर जाते ते बघावे लागेल.

नाडाचा नव्हे सरकारला नडल्याचा परिणाम

गेले दीड वर्ष कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करून आंदोलन करण्यात साक्षी मलिक, विनेश पह्गटसह बजरंग पुनिया आघाडीवर होता. त्यानेच हे प्रकरण चव्हाटय़ावर आणून कुस्तीतली मस्ती जगासमोर आणली. एवढेच नव्हे तर याप्रकरणी दोषींविरुद्ध अपेक्षित कारवाई न होत असल्यामुळे त्याने पेंद्र सरकारने दिलेला ‘पद्मश्री’ परत केला होता. पुनियाच्या या संतापामुळे सरकारची अब्रू वेशीला टांगली गेली होती. पुनिया सरकारी यंत्रणेला नडल्यामुळे नाडाच्या माध्यमातून त्याचा बळी दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र या प्रकरणात नक्की कुणी माती खाल्ली हे बाहेर येते की ते त्याचीही माती होते, याबाबत आता सांगणे कठीण आहे.