हिंदुस्थानच्या भविष्यासाठी आवर्जून मतदान करा! मुस्लिम धर्मगुरू, मौलानांकडून आवाहन

लोकसभेची निवडणूक देशाचे भविष्य ठरवत असते. त्यामुळे आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, सुदृढ लोकशाहीसाठी सर्वांनी मतदान आवर्जून करा. हिंदुस्थानात भाईचारा, सुखशांती अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. चांगला रोजगार मिळावा, प्रगती व्हावी यासाठी प्रत्येकाने योग्य उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन मुस्लिम समाजातील धर्मगुरू, मौलाना यांनी केले आहे.

देशात लोकसभा निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. त्यात आपणदेखील सहभागी झाले पाहिजे. देशाच्या संविधानाने आपल्याला मतदानाचा मोठा अधिकार दिला आहे. त्यामुळे आपल्या भवितव्यासाठी हा मतदानाचा अधिकार आवर्जून बजावायला हवा. कोणीही आपले बहुमूल्य मत वाया घालवू नका, असे आवाहन मशीद, सोयायटय़ांमध्ये, बैठकांच्या माध्यमातून मुस्लिम धर्मगुरू तसेच मौलाना, मुस्लिम समाजातील मान्यवर व्यक्ती मतदारांना करत आहेत. जो मतदान करणार नाही त्याला कुठल्याही सरकारविरोधात बोलण्याचा अधिकार नाही. कुठला उमेदवार आपल्यासाठी रोजगार, शैक्षणिक, आर्थिक प्रगतीसाठी कसोशीने प्रयत्न करेल. देशाच्या बळकटीसाठी झगडेल, लढेल अशा उमेदवाराला मतदान करा आणि देशाची लोकशाही मजबूत ठेवा, असे आवाहन मशिदीमध्ये जुमाच्या नमाजापूर्वी देण्यात येणाऱया प्रवचनातून तसेच विविध माध्यमांतून केले जात आहे.

मतदानाचा अधिकार असूनही जर कोणी मतदान करणार नसेल तर ती व्यक्ती स्वतःबरोबर देशाची आणि समाजाची दुश्मन ठरेल. कारण आपण योग्य उमेदवार निवडून संसदेत पाठवण्याचे काम करणार नसू तर एक प्रकारे आपण आपलेच दुश्मन असल्यासारखे होऊ. देशात भाईचारा, सुखशांती, माणुसकी, आपुलकी मजबूत ठेवण्यासाठी त्याचबरोबर रोजगार देणारे, कोणापुढे हात पसरवू न देता हाताला काम देणारे सरकार बनावे, यासाठी चांगले सरकार निवडून देण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. z मौलाना एजाज अहमद कश्मिरी, हंडी मशीद, भेंडी बाजार