अमेठीत काँग्रेस कार्यालयाबाहेर वाहनांची तोडफोड; भाजप गुंडगिरी करत असल्याच काँग्रेसचा आरोप

लोकसभा निवडणुकीत राजकारण तापत आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या रायबरेली आणि अमेठी या जागा नेहमीच चर्चेत असतात. अमेठी येथील गौरीगंजमधील काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. वाहनांवर हल्ला करणारे हल्लेखोर मद्यधुंद अवस्थेत होते. गोंधळ निर्माण झाल्याने कार्यालयातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते बाहेर आल्यावर हल्लेखोरांनी पोबारा केला. या घटनेमागे भाजपचा हात असून भाजपवाले आता गुंडगिरीवर उतरले आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

उत्तर प्रदेश काँग्रेसने आपल्या एक्सवर प्रतिक्रिया दिली आहे की, निवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजप घाबरली आहे. अमेठीमध्ये प्रशासनाच्या उपस्थितीत भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हा कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या अनेक वाहनांची तोडफोड केली. जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंघल कार्यालयात उपस्थित होते. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तेथून हल्लेखोरांचा पाठलाग केला. यावेळी पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली, असेही काँग्रेसने म्हटले आहे.

भाजपने आपला पराभव आताच मान्य केला आहे, म्हणूनच ते आता गुंडगिरीवर उतरले आहेत. काँग्रेस आणि राहुल गांधी कोणालाच घाबरत नाहीत. अमेठीमध्ये काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा आणि भाजपच्या स्मृती इराणी यांच्यात लढत होत आहे. हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने भाजपला आता पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे आता ते दडरशाहीचा वापर करत आहे. या हल्ल्यावेळी पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. भाजपकडून गुंडगिरी सुरू असताना पोलीस फक्त बघत होते. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे, असेही काँग्रेसने म्हटले आहे.